युद्धात आणि प्रेमातच नाही तर राजकारणात पण सर्व काही माफ असते, याचा प्रत्यय या विधान परिषद निवडणुकीतून आला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. 12 उमेदवार रिंगणात आहे. सर्वच पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहेत. त्यातच भाजपने एक नामी शस्त्र बाहेर काढले आहे. उल्हानगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना या निवडणुकीसाठी तुरुंगाबाहेर येत आहेत. त्यावरुन राजकारण तापले आहे. त्यांनी भाजपसह महायुतीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या खेळीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.
हा तर सत्तेचा दुरुपयोग
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. न्याय व्यवस्थेवर आपण बोलू शकत नाही. गणपत गायकवाड यांनी स्वतः गोळी झाडली हे सगळ्यांनी पाहिलं. निवडणूक आयोग बायस आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.निवडणूक आयोग त्यांच्या घराचा गडी आहे, असं झाले हे तर. सत्तेचा वापर केला जात आहे. उघड्या डोळ्याने हे सगळे पाहत आहेत. निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही आक्षेप नोंदवला असल्याचे दानवे यांनी सांगितले.
न्याय वेगळा कसा?
माझ्यावर खोटे आरोप करून जेल मध्ये टाकले होते. त्यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागितली पण मला मिळाली नाही. आश्चर्याची गोष्ट आहे गणपत गायकवाड यांच्या साठी वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं चित्र आहे. भाजपचा लोअर कोर्टवर दबाव असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकणार
महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकाने जादा उमेदवार लादलेला आहे. भाजपला सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नाही. अजित पवार गट,शिंदे गटाची सुद्धा मतं नाही. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले, काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नक्कीच आहेत. पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत.
महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत. 23 मतांचा कोठा आहे, मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील त्याविषयी आमच्या मनात शंका नाही. स्वतः उद्धव ठाकरे,शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.