Ajit Pawar : शरद पवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? बारामतीत काका-पुतणे येणार आमने-सामने!

| Updated on: Jul 05, 2023 | 8:07 PM

Sharad Pawar vs Ajit Pawar : एकंदरित पाहता आता काका-पुतणे आमने-सामने आले असून दोन्ही गटांमध्य संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वत: शरद पवार मैदानात उतरणार असल्याने निवडणुकीच्या रिंगणातही ते उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

Ajit Pawar : शरद पवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? बारामतीत काका-पुतणे येणार आमने-सामने!
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. 5 जुलै बुुधवारी शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर मध्ये बैठक बोलावली होती. अजित पवारांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2 जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांनीही 5 जुलैलाच मुंबईतील भुजबळ नॉलेज सिटी येथे बैठक बोलावली मात्र अजित पवार ‘पॉवरफुल’ ठरल्याचं दिसून आलं. शरद पवारांकडे 16 तर अजित पवारांकडे 32 आमदार बैठकीला उपस्थित होते. एकंदरित पाहता आता काका-पुतणे आमने-सामने आले असून दोन्ही गटांमध्य संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वत: शरद पवार मैदानात उतरणार असल्याने निवडणुकीच्या रिंगणातही ते उतरण्याची शक्यता आहे.

बालेकिल्ल्यातच काका-पुतणे येणार आमने-सामने

शरद पवार यांनी 1967 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक बारामतीतून लढवली. या निवडणूकीत शरद पवार प्रचंड मतांनी निवडून आले. 1990 पर्यंत शरद पवारांनी बारामतीचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. यानंतर अजित पवार बारामतीतून विधानसभेत निवडून गेले. 1967 पासूनच बारामती हा पवार कुटुंबाचा गड राहिला आहे. शरद पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा संघाचे प्रतिनिधित्व करतात. आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर काका-पुतण्यात पक्षावरून वाद सुरु झाला आहे. पुतण्याचे बंड शमवण्यासाठी शरद पवार अजित पवार यांच्या विरुध्द बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आता थेट दावा केला आहे. 30 जून रोजी अजित पवार गटाकडून राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर राष्ट्रवादीच्या 40 आमदार-खासदार यांच्या सह्या आहेत. या याचिकेनूसार अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष निवडण्यात आल्याचं म्हटलं आहे. हा थेट दावा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वाद निर्माण करणारा आहे.

आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी शरद पवारांवर थेट वक्तव्य केलं. मला वारंवार व्हीलन केलं जातं. शरद पवारांच्या धोरणामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. माझी वरिष्ठांना विनंती आहे, त्यांनी आता आराम करावा, जास्त हट्टीपणा करू नये, असा टोला अजित पवारांनी लगावला. तर शरद पवारांनीही आपल्या भाषणात अनेक मुद्दे मांडले. आजची बैठक ऐतिहासिक असल्याचं शरद पवार म्हणाले. पक्षात फूट पडली असली तरीही चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. माझा फोटो ते वापरतात त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही, अशीही टिकाही पवारांनी केली.