मुंबई | राज्य सरकारचा रविवारी 2 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असं समजलं जात होतं. मात्र पडद्यामागे काही वेगळचं घडत होतं. शिवेसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील आमदारांनी बंड पुकारलं आणि राज्य सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीचे हे आमदार सरकारच्या गळाला लागले. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी गेल्या साडे तीन वर्षात एकूण तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उर्वरित 8 आमदारांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांही हजेरी लावली होती. या बंडखोर नेत्यांविरोधात राष्ट्रवादी एक्टीव्ह मोडमध्ये आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या 3 नेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे या 3 नेत्यांवर कारवाई करत असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे आणि विजय देशमुख या तिघांविरोधात बडतर्फीची कारवाई केली आहे. या तिन्ही नेत्यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या तिन्ही नेत्यांची ही कृती राष्ट्रवादीच्या शिस्त आणि पक्षाच्या ध्येयधोरणे विरोधात असल्याचं म्हटलंय. या कारणामुळे या तिन्ही नेत्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस एक्शनमोडमध्ये
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. नरेंद्र राणे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना… pic.twitter.com/3PIMG2OLSh
— NCP (@NCPspeaks) July 3, 2023
शिवाजीराव गर्जे यांची राष्ट्रवादीच्या सदस्यत्यावरुन आणि राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तर विजय देशमुख यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि अकोला शहर जिल्हाध्यक्ष पदावरुन बडतर्फ करण्यात आलं. तर नरेंद्र राणे यांच्याकडे मुंबई विभागीय राष्ट्रवादी कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.
शिवाजीराव गर्जे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. गर्जेंचे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेत्यांसह घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गर्जे यांच्याकडे 2014 साली राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वंसतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाची जबाबदारी होती.