
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडला. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार आज सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार फक्त एकटेच गेले नाहीत, तर अनेक आमदारही घेऊन गेले. त्यामुळे वर्षभरात राज्यात शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांच्या बंडामुळे एकच खळबळ उडाली. अजित पवार यांनी गेल्या साडे तीन वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री लाभले.
तसेच अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील या 9 जणांनी शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील सभागृहात या 9 आमदारांना पद आणि गोपनियतेची दिली. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
आता या मंत्र्यांना कोणती खाती दिली जातात,याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. लवकरच खातेवाटप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं महत्वाचं आणि मोठं खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय. सध्या अर्थ खात्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रिपदासह पुण्याचं पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सार्थपणे पार पाडली होती. त्यामुळे आता दादांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या गळ्यात कोणत्या मंत्रिमदाची माळ पडते, याबाबत उत्सूकता लागून राहिली आहे.
दरम्यान अजित पवार विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत राज्य सरकारसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या जितेंद्र आव्हाड यांची राज्याच्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासह आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.