Amol Kolhe | राष्ट्रवादीतील भूकंपानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे मोठी जबाबदारी

| Updated on: Jul 11, 2023 | 8:21 PM

NCP Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी आणि महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Amol Kolhe | राष्ट्रवादीतील भूकंपानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे मोठी जबाबदारी
Follow us on

मुंबई | अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडली. अजित पवार यांच्यासह पहिल्या फळीतील नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. शरद पवार यांचे गेली अनेक दशकं निष्ठावंत राहिलेल्यांनी एका झटक्यात आपली भूमिका बदलली आणि सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला खिंडार पडलं. राष्ट्रवादीतील या राजकीय भूकंपानंतर कालपर्यंत एकत्र असेलले हे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

तर अजित पवार गट सोडून गेल्याने आता राष्ट्रवादीत अनेक पदं रिक्त झाली आहेत. राष्ट्रवादीकडून बंडखोरी केलेल्या कार्यकर्त्यांची पक्षातून गच्छंती करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनेक पदांसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करतायेत. अशात मोठी बातमी समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील वर्षात अर्थात 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

ट्विटरमध्ये काय म्हटलंय?

अमोल कोल्हे यांना नियुक्तीचं प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या हस्ते हे नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. यावेळेस राष्ट्रवादीच्या खासदार आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले आणि अन्य नेते उपस्थित होते.

अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया

अमोल कोल्हे यांनी या नियुक्तीनंतर ट्विटद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो! आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल!”, असं ट्विट कोल्हे यांनी केलंय.

…आणि अमोल कोल्हे साहेबांसोबतच

दरम्यान 2 जुलै रोजी अजित पवार आणि इतर 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेत सत्तेत सामील झाले. या शपथविधीचा कार्यक्रम हा राजभवनात पार पडला. या शपथविधीला शिंदे गटातील आणि भाजपचे मंत्री आणि महत्वाचे नेते हजर होते. सोबतच राष्ट्रवादीतील नेत्यांचाही समावेश होता. यात अमोल कोल्हे हे देखील होते. मात्र त्यानंतर काही तासांनी अमोल कोल्हे यांनी ट्विट करत “मी साहेबांसोबत” असल्याचं जाहीर केलं होतं.