Rani Update: आणखी दोन दिवसांनी पावसाचा जोर कमी होणार; वेधशाळेचा अहवाल; रायगड, पालघरमध्ये मात्र रेड अलर्ट
येत्या काही दिवसांमध्ये पुणे, मुंबईत सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 16 तारखेपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. असं असेल तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहितीही पुणे वेधशाळेने दिली आहे.
मुंबई: राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे, अनेक जिल्ह्यातून पूरपरिस्थिी असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी असणाऱ्या पर्यटन ठिकाणांवर 17 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या पर्यटन ठिकाणांवर 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासाऱखीच परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यातून झाली आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे आता हवामान खात्याकडून महत्वाची सूचना देण्यात आली आहे. अजून दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस असून त्यानंतर मात्र संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे (Pune Observatory) संचालक डॉ. अमुपम कश्यपी यांनी दिली आहे.
दोन दिवसांनंतर पाऊस उसंत घेणार
सध्या पुणे आणि घाटमाध्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक नद्यांना पूर आला असून परिसर सगळा जलमय झाला आहे. मात्र आता दोन दिवसांनंतर पाऊस उसंत घेणार(Rain decrease) असून राज्यातील बहुतांशी भागात पाऊसाचे प्रमाण कमी असणार आहे.
रायगड, पालघरमध्ये मात्र रेड अलर्ट
राज्यात इतर ठिकाणी पाऊस कमी होणार असला तरी पुढेच दोन दिवस रायगड, पालघरमध्ये मात्र रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कायम
पूर्व विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले असून विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यात पावसाने चांगलीच तारांबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अजूनही पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
16 तारखेपासून राज्यात पाऊस कमी
येत्या काही दिवसांमध्ये पुणे, मुंबईत सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 16 तारखेपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. असं असेल तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहितीही पुणे वेधशाळेने दिली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रिच्या घाट माथ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.