मुंबई : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नुकतंच शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. (Maharashtra School Reopen From 27 January)
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
दरम्यान मुंबईतील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता 16 तारखेपासून पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतील शाळा आणि कॉलेज बंदच राहणार आहे, असे पत्रक मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.
मुंबई महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. मात्र तरीही अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि इतर राज्याची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 16 जानेवारी 2021 पासून बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या पत्रकात नमूद केले आहे.
20 जानेवारीपर्यंत महाविद्यालय सुरु करण्याचा विचार
तर दुसरीकडे येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याबाबत विचार आहे, असे वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना ही माहिती दिली होती.
“येत्या 8 ते 10 दिवसात याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, कॉलेज, वसतिगृह याबाबतचा चर्चा निर्णय घेतला जाईल. यानंतर येत्या 20 जानेवारीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील महाविद्यालय सुरु करता येतील का? काही नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरु आहे,” असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. (Maharashtra School Reopen From 27 January)
संबंधित बातम्या :
काऊंटडाऊन सुरु, कॉलेज कधी सुरु होणार? मंत्री उदय सामंत म्हणतात…