राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत मोठा उलटफेर दिसला. 2019 रोजी महाविकास आघाडी तर नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेत मोठी फूट पडल्याने राजकारण हादरले. भाजपाने ऑपेरशन लोट्स राबवल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला. त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही गट लोकसभेत आमने-सामने आले. दोन्ही गटांनी लोकसभेत निकाराचा लढा दिला. आता विधानसभेतही अनेक जागांवर शिंदे सेना आणि उद्धव सेनेत थेट सामना रंगला. एक्झिट पोलनुसार, जनतेच्या न्यायालयात कोणत्या शिवसेनेला अधिक पसंती मिळाली आहे?
इतक्या जागांवर शिवसैनिक मैदानात
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीत 95 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने 81 जागांवर निवडणूक लढवली. विविध एक्झिट पोलमध्ये शिंदे सेनेच्या पारड्यात अधिक जागा टाकण्यात आल्या आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला पण तुल्यबळात कमी जागा देण्यात आलेल्या नाहीत. या अंदाजानुसार या दोन्ही गटात मोठा फरक नाही.
टीव्ही ९ रिपोर्टर पोलचा आकडा काय?
टीव्ही ९ रिपोर्टर पोलच्या आकडेवारीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रमात महायुतीच्या पारड्यात 129 ते 139 जागा असतील. त्यात भाजपाला 80 पेक्षा अधिक जागा मिळतील. तर शिवसेना शिंदे गटाला 25 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात अजित पवार गट 23 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे.
महाविकास आघाडीला या पोलमध्ये 136-145 जागा मिळतील असा अंदाज आहे. यामध्ये काँग्रेसला 50 पेक्षा अधिक जागा मिळतील. ठाकरे गटाला 44 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. शरद पवार गट 42 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेईल असे दिसत आहे. या अंदाजानुसार, शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाने अधिक जागांवर झेप घेतल्याचे दिसून येते.
इतर पोलाचा आकडा काय?
पोल डायरीच्या अंदाजानुसार, शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागा मिळतील तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकशाही -मराठी रुद्र नुसार, शिंदे गटाला 30 ते 35 जागांवर विजय मिळेल तर ठाकरे गटाला 39 ते 43 जागांवर विजयाला गवसणी घातला येईल. इतर पोलमध्ये पण कमी-अधिक असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे.