Ajit Pawar : विधानसभेला एक तरी जागा ओढून आणाच; सासुरवाडीतील मंडळीचा हट्ट अजितदादा पुरवतील का?
Maharashtra Vidhansabha Election 2024 : तर झालं असं की महायुती आणि महाविकास आघाडीमुळं काही ठिकाणी इच्छा असून सुद्धा आपला उमेदवार उभं करणं पक्षांना काही जमेना. काही जिल्ह्यात तर अवघ्या एका जागेवर तर काही ठिकाणी उमेदवारच नाही अशी काहीशी स्थिती आहे. त्यात अजितदादा, त्यांच्या सासुरवाडीतील मंडळीचा हट्ट पुरवतील का? याची खमंग चर्चा रंगली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे ते तीन पक्षांचे कोंडाळे झाले आहे. पूर्वी मतदारसंघात परंपरागत पक्ष एकमेकांविरोधात उमेदवार उतरवून प्रचाराचा बार उडवत होते. मात्र यंदा राज्याच्या राजकारणाने कूस बदलली आहे. आता कोण कुणाचा शत्रू आणि कोण मित्र हे आघाडी आणि महायुतीवरून कळत आहे. तिकीट वाटपात सुद्धा त्याचा परिणाम दिसून आला. अनेक मतदारसंघाबाबत पक्षांना तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागली. काही जिल्ह्यात तर काही पक्षांना उमेदवारच देता आलेला नाही. तर काही जिल्ह्यात एक-दोन उमेदवारांवर जुळवून घ्यावं लागलं आहे. ज्या जिल्ह्यात (Osmanabad Constituency) एकही जागा सुटली नाही तिथले पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आता पक्षश्रेष्ठींकडे जागेसाठी आग्रह धरत असल्याने त्यांना सुद्धा पेच निर्माण झाला आहे.
सासुरवाडीतच उमेदवार नाही
तर धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. परंडा आणि उमरगा मतदारसंघातून शिंदे सेनेचे शिलेदार उभे ठाकले आहेत. तुळजापूरात भाजप खिंड लढवणार आहे. तर उरलेल्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी चुरस सुरू आहे. बरं ही चुरस वरवर तीन पक्षात दिसत असली तरी खरी फाईट शिंदे सेना आणि भाजपमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकीकडे तानाजी सावंत तर दुसरीकडे भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील आग्रही आहेत.




अजित पवार यांची धाराशिव ही सासुरवाडी आहे. त्यामुळे इतर तीन जाऊ द्या पण निदान उस्मानाबाद विधानसभेसाठी तरी अडून बसायला काय हरकत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसेच्या दादा गटाला वाटत आहे. ही जागा महायुतीत राष्ट्रवादीला सुटावी अशी गळ कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी तर त्यासाठी मुंबईत तळ ठोकल्याची चर्चा आहे.
अनेक इच्छुकांच्या भाळी बाशिंग
उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ही जागा आपल्या पक्षाला सुटावी यासाठी जिल्ह्यातील बडे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी वरिष्ठांकडे या जागेसाठी आग्रही भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे दादा गटाने जिल्ह्यात विधानसभेला किमान एक तरी जागा असावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे. भाजपकडून या मतदारसंघासाठी नितीन काळे, सरोजिनी राऊत, अजित पिंगळे, शिंदे गटाकडून नितीन लांडगे, सुरज सोळंके, सुधीर पाटील, शिवाजी कापसे तर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावतं पण इच्छुक आहेत.
कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार?
लोकसभेत धाराशिव जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आस्मान दाखवले होते. अजितदादांनी या ठिकाणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उभं केले होते. त्यासाठी धडाक्यात प्रचार आणि सभी ही झाल्या. पण निकालात दादा गटाचं पानीपत झालं. उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी मोठ्या आघाडीने पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे विधानसभेला धाराशिवची जागा नकोच असं काहीसं समीकरण असल्याची चर्चा आहे. दादांना आता कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागणार आहे.