Mahayuti : महायुतीचा घोडा मुंबईतच अडला, महापालिका निवडणुकीमुळे जागा वाटपाचा तिढा सुटेना?; कोणत्या जागा रखडल्या?
Mahayuti Seat Sharing : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचं भासवण्यात येत असलं तरी आतून मात्र धुमश्चक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. पण महायुतीचं गाडी मुंबईवर येऊन अडकली आहे. इतक्या जागांवर अजूनही पेच असल्याचे समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखा घोळ न करण्याच्या निश्चियाने यावेळी महायुतीने जागा वाटपांबाबत झपाटून काम केले. महायुतीने जागा वाटपांमध्ये आघाडी घेतली. महाविकास आघाडीला जरा उशीरा सूर गवसला. पण तोपर्यंत त्यांच्यात सर्व काली आलबेल नसल्याचा संदेश बाहेर आला. तर महायुतीमधील नेत्यांनी जागा वाटपाविषयी आगपाखड केली नाही. पण अंतर्गत धुसफूस अजूनही सुरू असल्याचे दिसून येते. जागा वाटपाचे कवित्व अजूनही संपलेले दिसत नाही. हत्ती गेला पण शेपूट अडकले अशी महायुतीची अवस्था झाली आहे. मुंबईतील या जागांवर महायुतीचे घोडे अडले आहे. कोणत्या आहेत या जागा?
दिल्ली दरबारी नरमाई, मुंबईत राग दरबारी
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून घोळ टाळण्याचा महायुतीमध्ये सुरुवातीपासून प्रयत्न झाला. भाजप मोठा भाऊ असला तरी इतरांनी पण त्यांच्या जागांसाठी जोर लावला. जागा वाटपाचा पेच मुंबईत सुटत नसल्याने त्यावर दिल्ली दरबारी खल झाला. गुरूवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. या बैठकीची फलनिष्पत्ती समोर आली. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपावर समाधानकारक तोडगा काढल्याचे दिसून आले.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील 288 विधानसभा जागांमधील 278 जागांवर (Maharashatra Vidhansabha Election 2024) मतभेद संपल्याचे आणि जागा वाटप झाल्याचे निश्चित झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पण 10 जागांवर पेच कायम असल्याची माहिती त्यांनी नागपूरमध्ये दिली होती. या दहा जागांवर आता जास्त ताणाताणी होणार नाही आणि लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल असे, त्यांनी सांगितले. एक दोन दिवसांत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.
मग माशी नेमकी शिंकली कुठं?
राज्यातील अनेक भागातील जागा वाटपावर तीनही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तर उर्वरीत दहा जागांवरील पेच कायम असल्याचे ते म्हणाले. या दहा जागा कुठल्या आहेत, याची चर्चा रंगली. या जागा मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि उद्धव सेनेत मुंबईवर अधिकार सांगण्यात आला. तसाच वाद भाजप आणि शिंदे सेनेत असल्याचे समोर आले आहे. महापालिका निवडणुकीचे गणित पण विधानसभेतच जोडण्यात येत असल्याने जागा वाटपाचा पेच सुटला नसल्याची माहिती समोर येत आहे. या जागा दहापेक्षा अधिक आहे.
या मतदारसंघावरून पेच कायम
वरळी
शिवडी
चेंबूर
बोरिवली
भांडुप
विक्रोळी
घाटकोपर पूर्व
शिवाजीनगर मानखुर्द
अंधेरी पूर्व
वर्सोवा
मुंबादेवी
कलिना