निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, सभांचा धडाका; शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा
Maharashtra Vidhansabha Election 2024 Prachar Sabha : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज सगळ्या राजकीय पक्षांकडून सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. वाचा सविस्तर...
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची गडचिरोलीत सभा होणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही गडचिरोलीत सभा होणार आहे. याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहे. मुंबईतील वांद्रे भागातील बीकेसी मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभांमधून नेते मतदारांना काय साद घालणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
अमित शाहांची सभा
गडचिरोलीत केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची आज प्रचार सभा होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी अहेरी या तीन मतदार संघाच्या प्रचारासाठी आज गडचिरोली अमित शाह दाखल होणार आहेत. अकरा वाजता मतदारांना संबोधित करणार आहेत. मागच्या 2019 च्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत अमित शाह पहिल्यांदाच गडचिरोलीत येणार आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर प्रचार सभा होणार आहे.
प्रियांका गांधी गडचिरोलीत
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी देसाईगंज इथं प्रचार सभा होणार आहे. प्रियांका गांधी यांची गडचिरोली जिल्ह्यात या निवडणुकीत पहिलीच सभा देसाईगंज इथं होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज महायुतीचे विरुद्ध महाविकासचे अनेक दिग्गज नेत्यांचे प्रचार सभेमुळे सर्वांचे लक्ष या दोन प्रचार सभेवर आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात गडचिरोली जिल्ह्यात मोठे नेत्यांचे प्रचार दौरे होणार आहेत.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही आज सभा होणार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचारसभेला शिंदे उपस्थित असणार आहेत. साक्री, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ, नांदगाव, भांडुप, भायखळा या ठिकाणी शिंदेंच्या सभा होणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सभा होणार आहे. चांदवड, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभेचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज गाव भेट दौरा करणार आहेत.