राज्याच्या अभूतपूर्व रणधुमाळीत कोण राखणार गड? विदर्भ, मराठवाडा, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत काय असतील समीकरणं? विधानसभा निवडणुकीची अपडेट एका क्लिकवर

Maharashatra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक भूमिका जाहीर केल्याने आता महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस निर्माण झाली आहे. मुंबई, कोकण, ठाणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात राजकीय समीकरणं एकसारखी नाहीत, मग कोण मारणार बाजी?

राज्याच्या अभूतपूर्व रणधुमाळीत कोण राखणार गड? विदर्भ, मराठवाडा, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत काय असतील समीकरणं? विधानसभा निवडणुकीची अपडेट एका क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 11:54 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावागावात जाऊन थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम उमेदवार करत आहेत. त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागत आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न उभे करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेक मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. आता महाविकास आघाडी आणि महायुतीत (Maharashatra Vidhansabha Election 2024) चुरस निर्माण झाली आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात राजकीय समीकरणं एकसारखी नाहीत, मग कोण मारणार बाजी?

प्रत्येक प्रदेशात वेगळी समीकरण

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील सत्ता समीकरणं आणि प्रचाराची मुद्दे वेगवेगळी आहेत. प्रत्येक भागात त्या त्या पक्षाची कमी अधिक पकड आहे. त्यातच स्थानिक अंडर करंट आहेत. त्याचा मोठा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. मुंबईत दोन सेनेसह मनसे रिंगणात उतरली आहे. तर उत्तर भारतीयांची मतं खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजप मित्रपक्षांसह मैदानात उतरली आहे. कोकणातील मुद्दे वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सध्या ऊस गाळपाचा हंगाम जोरात आहे. तिथं समीकरणं वेगळी आहेत. अशात नागरी समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विकासाच्या मुद्दासह आरक्षणाची मुद्दा तीव्र झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात राजकीय गणितं वेगळी आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबईचं समीकरण काय?

मुंबई परिसरात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. हा परिसर शिवसेनाचा बालेकिल्ला समजण्यात येतो. पण अचानक ऑपरेशन लोट्समुळे राज्यात भूकंप झाला. शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने महाविकास आघाडीचं सरकार पडलं. शिंदे सेना आणि ठाकरे सेना दोन विरुद्ध गट तयार झाले. या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 3 पैकी 2 खासदार निवडून आले. 2019 मध्ये अखंड शिवसेनेचे 15 आमदार मुंबईत होते. मुंबईत भाजपचा पण दबदबा आहे. त्यांचे सुद्धा 15 आमदार आहेत.

भाजपचे आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, अमित साटम, तमिळ सेल्वन, मनीषा चौधरी सारखे मोठे नेते आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील प्रभू, सुनील राऊत, रमेश कोरगांवकर सारखी नेते आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढाई आहे. तर मनसेने सुद्धा अनेक मतदारसंघात उमेदवार उतरवले आहेत. काही ठिकाणी त्यांनी महायुतीविरोधात सुद्धा उमेदवार दिले आहेत. तर दुसरीकडे उत्तर भारतीय पट्ट्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट मुकाबला आहे. काँग्रेसने अमिन पटेल, अस्लम शेख, ज्योती गायकवाड, नसीम खान हे चेहरे दिले आहेत. तर नवाब मलिक, सना मलिक यांना अजित पवार गटाने मैदानात उतरवले आहे.

कोकणात रणधुमाळी

कोकणात खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर उद्धव सेनेला रोखण्याचे मोठे आवाहन आहे. तळकोकणातही महाविकास आघाडी सुरूंग लावण्याच्या तयारीत आहे. भास्कर जाधव यांच्यासह इतर नेते उद्धव सेनेसाठी करिष्मा करतील का हे समोर येईल. शिंदे सेनेचे उदय सामंत, दीपक केसरकर तर दुसरीकडे निलेश राणे, किरण सामंत हे किल्ला लढवत आहेत. यावेळी कोकणात उद्धव सेना आणि एकनाथ सेनामध्ये थेट मुकाबला दिसेल. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरली आहे.

ठाण्याची राजकीय समीकरणं काय?

महाराष्ट्रातील ठाणे हा शिंदे गटाचा बालेकिल्ला मानण्यात येतो. येथे धर्मवीर आनंद दिघेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत शिवसेनेचा आक्रमक चेहरा दिसला आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाण्यात यंदा विधानसभेत उद्धव सेना आणि एकनाथ सेनेत थेट सामना दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ सिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. सोबतच मनसे सुद्धा काही जागांवर चमत्कार दाखवू शकते. मनसेने या पट्ट्यात 6 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. प्रचाराचा नारळ फोडला आहे.

शिंदेसोबत प्रताप सरनाईक, भाजपचे रविंद्र चव्हाण, गणेश नाईकसह इतर दमदार नेते मैदानात आहेत. तर दुसरीकडे राजन विचारे, केदार दिघे हे उद्धव सेनेचे शिलेदार आहेत. बंडाळीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांना शिंदे गट सामोरे जात आहे. त्यामुळे शिंदे गट किंग मेकरच्या भूमिकेसाठी कोणतीच कसर सोडणार नाही.

उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

उत्तर महाराष्ट्रात भाजपसह शिवसेनेने मोठा जनाधार मिळवला होता. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार दादा भुसे, गुलाबराव पाटील, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ताकदीचे नेते आहेत. तर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला मानणारा पण एक मोठा वर्ग आहे. या भागात उद्धव ठाकरे शिंदे सेनेला मोठा झटका देऊ शकतात. तर दुसरीकडे मराठा आंदोलनाचा थेट परिणाम भाजप मतदारसंघात दिसण्याची शक्यता पण आहे.

उत्तर महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात काटे की लढत होणार आहे. शिंदे सेना सोडली तर एरंडोल, पाचोरा, जळगाव शहर आणि रावेरमध्ये सर्वच पक्षात बंडखोरांचं पीक आलं आहे. चोपडा, भुसावळ, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर, जळगाव शहर अशा ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र कुणाची झोप उडवणार?

पश्चिम महाराष्ट्रातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. या भागात आतापर्यंतचा सर्वाधिक ड्रामा दिसून आला आहे. बारामतीपासून ते कालपरवापर्यंत कोल्हापूरात झालेल्या नाट्यमय घाडमोडींनी महायुतीसह महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. या भागात शरद पवार कोणती खेळी खेळतात हा चर्चेचा विषय आहे. या भागात स्थानिक मुद्यांसह मराठा आंदोलनाचा फॅक्टरही चर्चेत आहे. बारामतीमधील निवडणूक हायहोल्टेज ठरण्याची शक्यता आहे. नवखे युगेंद्र पवार बारामतीत पवार कुटुंबियांचा नवीन चेहरा ठरतात की अजित पवार यांना जनता निवडून देणार ही एक चर्चा रंगली आहे.

शरद पवार गोटातील सर्वात जुने नेते जयंत पाटील यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार, रोहित पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक शिलेदार पवारांच्या सोबतीला आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांना बारामतीसह इतर मतदारसंघात पण बळ पुरवायचे आहे. यावेळी अजित पवारांना स्व‍कीयांकडून आणि मित्र पक्षांकडून कोणताही दगाफटका बसला तर राजकीय कारकि‍र्दीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता आहे. लोकसभा पॅटर्न विधानसभेत दिसू नये यासाठी त्यांना डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीत अजून स्थानिक समीकरणं वेगळी आहेत. तिथं पण चुरशीचा सामना दिसणार आहे.

मराठवाडा देणार कुणाला साथ?

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने मराठवाडा व्यापला होता. बीडचा अपवाद वगळता मराठवाड्याने शिवसेनेला जवळ केले होते. पण 2019 नंतर समीकरणं बदलली. दोन सेना, दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा मेळा जमला आहे. त्यातच मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदु आणि धग मराठवाड्यात सर्वाधिक असल्याने यंदा कुणाच्या पारड्यात मराठवाडा मतांचा जोगवा टाकणार याचा संभ्रम कायम आहे. मराठवाड्याने लोकसभेला काँग्रेस, उद्धव सेनेला भरभरून दिले. आता विधानसभेत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाला येथे मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे सेनेला पुन्हा मैदाना मारण्यासाठी जमीन कसत आहेत. तर दुसरीकडे भूमरे, सिरसाट या शिलेदारांना चमत्कार घडवून आणायचा आहे. तानाजी सावंत, संतोष बांगर यांच्यासह धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांना नवीन आव्हानांचा सामना करत मतदारसंघात विजयाचा झेंडा फडकवायचा आहे.

विदर्भात मजबूत कोण?

विदर्भात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. ओबीसी राजकारणासह मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि स्थानिक मुद्दे येथे महत्त्वाचे ठरतील. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील मु्द्यांची सरळमिसळ आणि गल्लत होत नाही. या दोन्ही भागातील समस्या वेगळ्या आहेत. 2014 पूर्वी काँग्रेसचा दबदबा असलेल्या विदर्भाला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे. अखंड शिवसेनेने पण काही मतदारसंघात चमत्कार दाखवला आहे. पण आता कमळ विरुद्ध पंजा असा सामना रंगणार आहे.

विदर्भात नाना पटोले, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, सुनील केदार सारखी मोठी नावं आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे सारखी मजबूत टीम आहे. काही भागात वंचित, बच्चू कडू यांची तिसरी आघाडी समीकरणं बिघडवण्याची शक्यता आहे.

चर्चेतील काही मतदारसंघ

पोखरी-पाचपाखड़ी : ठाणे शहरातील पोखरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ हॉट सीट आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे केदार दिघे हे आहेत. केदार हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.

बारामती : पुणे शहरातील बारामती मतदारसंघातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागेल आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीने शरद पवार गटाकडून अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीत उतरवले आहे.

वरळी : मुंबईतील वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि नेते आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर महायुतीचे नेते मिलिंद देवडा मैदानात आहेत.

माहिम : माहिममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नेते महेश सावंत उभे ठाकले आहेत.

वांद्रे पूर्व : बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान हा अजित पवार गटाच्या तिकिटावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहे. यापूर्वी या मतदारसंघात झिशान याने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. झिशानविरोधात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई निवडणूक लढवत आहेत.

अणुशक्ति नगर : या जागेवर अजित पवार यांच्यावतीने सना मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून फहाद अहमद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अविनाश राणे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.

मानखूर्द शिवाजीनगर : हा मतदारसंघ पण एकदम चर्चेत आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नबाब मलिक आणि शिवसेनेकडून सुरेश पाटील आमने-सामने आहेत. तर महाविकास आघाडीने येथे समाजवादी पक्षाला जागा सोडली आहे. सपातर्फे अबु आझमी निवडणूक लढवत आहेत.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.