रोहित पवार यांनी लॉन्च केलेल्या महाराष्ट्रातील ‘या’ उभरत्या रॅपरचं साँग होतंय हिट, पाहा व्हिडीओ!
रॅप साँग म्हटलं की असभ्य भाषा, अर्वाच्य भाषा, शिव्या आणि चित्र विचित्र शब्दांची मांडणी हेच दिसतं. परंतु, अत्यंत उत्तम पद्धतीने शब्दांची मांडणी या रॅपमध्ये केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवा वर्गाला एकत्र आणून महाराष्ट्राच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला जावा आणि युवांच्या अपेक्षा या एखादं धोरण निश्चित करताना सरकारकडून लक्षात घेतल्या जाव्या या उद्देशाने महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी केली आहे.
राज्याच्या विकासाबद्दल आपल्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के असलेल्या युवा वर्गाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांना नेमकं काय वाटतं. याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात जाऊन तरुणाईशी संवाद साधताना दिसत आहेत. तरुणाईकडून येणाऱ्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरे देखील देत आहेत. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक युवांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे.
तरुणाईशी असलेली आपली नाळ जपत आमदार रोहित पवार यांनी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र व्हिजन फोरम या सामाजिक उपक्रमाचे रॅप सॉंग लॉन्च केले आणि अल्पावधीतच या रॅप साँगने तरुणाईच्या मनावर अधिराज्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
राज्यातील गेल्या काही दिवसातील परिस्थिती पाहिली तर युवा रॅपर राजकारणी यांच्यातील वेगळेच समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. तसेच अनेक वेळा रॅप साँग म्हटलं की असभ्य भाषा, अर्वाच्य भाषा, शिव्या आणि चित्र विचित्र शब्दांची मांडणी हेच दिसतं. परंतु, अत्यंत उत्तम पद्धतीने शब्दांची मांडणी करून महाराष्ट्र व्हिजन फोरम या उपक्रमाची माहिती व सध्याचे राज्यातील असलेले वास्तव या रॅपच्या माध्यमातून मांडण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला आहे. वास्तववादी लिखाणामुळे आणि उत्तम संगीत बांधणीमुळे युवा वर्गही या रॅपकडे खेचला गेला आहे. सध्या तरुण वर्गात या रॅपचा मोठया प्रमाणावर बोलबाला दिसून येत आहे.
दरम्यान, सध्याचा युवा वर्गातील ट्रेंड लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच हे रॅप साँग लॉन्च केले होते. शुभम जाधव अर्थात रॉकसन या उभरत्या रॅपरने हे गाणे गायलेले आहे. आणि अत्यंत कमी कालावधीत हे व्हाट्सअपसह इतरही समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.