मुंबई | 30 जानेवारी 2024 : महात्मा गांधी… ज्यांचं नाव जरी घेतलं, तरी मनात आदर निर्माण होतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन… महात्मा गांधी यांच्या हत्येला आज 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसेने गोळ्या झाडून महात्मा गांधी यांची हत्या केली. गांधींसारख्या शांतीप्रिय माणसाची हत्या होणं ही भारताच्या इतिहासातील अप्रिय घटना होती. या हत्येनंतर भारताच्या सामाजिक जीवनावर परिणाम झाले. पण 30 जानेवारी आधीही नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले होते. सतत होणाऱ्या हल्ल्यांनंतर महात्मा गांधी यांनी महत्वाचं आवाहन केलं होतं.
30 जानेवारी 1948 यांची हत्या झाली. पण त्या घटनेच्या 10 दिवस आधी गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी महात्मा गांधींवर हल्ला केला होता. दिल्लीतील बिर्ला हाऊस या ठिकाणी महात्मा गांधींवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून महात्मा गांधी बचावले. पण पुढे दहाच दिवसात महात्मा गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला झाला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला. गांधींच्या हत्येने देश शोकसागरात बुडाला.
पुणे टाऊन हॉल परिसरातही महात्मा गांधी यांच्यावर हल्ला झाला. गांधीजींच्या गाडीवर हँडग्रेनेड टाकण्यात आलं. पण हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं. गाडीच्या बाजूला या ग्रेनेडचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. महाबळेश्वरमधील पाचगणीमध्येही महात्मा गांधींवर हल्ला झाला. वर्ध्यातील सेवाग्राममध्येही महात्मा गांधींवर युवकाने हल्ला केला.
1945 साली महात्मा गांधी मुंबई ते पुणे असा रेल्वे प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी कसारा घाटात ही रेल्वे पोहोचली तेव्हा या रेल्वे रूळांवर लाकडाचे ओंडके, दगडाचे ढीग ठेवण्यात आले होते. रेल्वे चालकाला हा अडथळा दिसला. त्याने जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या सगळ्यानंतर गांधीजी पुण्यात आले. तेव्हा हल्लेखोरांना गांधीजींनी आवाहन केलं. ज्यांना मला मारायचं आहे, त्यांनी मारावं. पण त्यामुळे माझ्यासोबतच्या लोकांना इजा पोहचवू नये, असं महात्मा गांधी म्हणाले होते.