मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा, पोलिसांच्या परवानगीवर संशय कायम
मुंबईतल्या मोर्चात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष ताकद लावणार आहेत.
मुंबई : राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी महाविकास आघाडी शनिवारी मोर्चा काढणार आहे. मात्र, अद्याप मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं विरोधकांनी सरकारला संघर्षाचा इशारा दिलाय. मुंबईतला महाविकास आघाडीचा मोर्चा दोन दिवसांवर आलाय. पण, मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. महाविकास आघाडींच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. तयारीही पूर्ण झाली आहे. पण, आता परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यावरूनच विरोधक सरकारशी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत.
जीजामाता उद्यान ते आझाद मैदानासाठी महाविकास आघाडीनं मोर्चासाठी परवानगी मागितली होती. तसंच टाईम्सच्या इमारतीशेजारी स्टेज उभारून भाषणाची तयारी आहे. मात्र, रिचर्डसन कुडास कंपनी ते सीएसीटीपर्यंत मोर्चा काढण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. तसंच पोलिसांनी स्टेजसाठी परवानगी नाकारली.
परवानगी दिली नाही तर ट्रेलरवर भाषणाची तयारी महाविकास आघाडीनं केली आहे. अतिशय शांततेच्या मार्गानं मोर्चा होईल. आवश्यक त्या परवानग्या मागितल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. परवानगी हातात आली नसली, तरी ती येईल, असा विश्वास असल्याचं अजित पवार यांनी व्यक्त केला.
पोलिसांना परवानगी द्यावी लागेल. अटका होतील. पण, मोर्चाला लोकं जाणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्यपालांवर कारवाई करून त्यांना हटवावं, अशी महाविकास आघाडीची मागणी आहे.
मुंबईतल्या मोर्चात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष ताकद लावणार आहेत. जवळपास तीन लाखांच्या गर्दीचं टार्गेट आहे. त्यासाठी मुंबईच्या आजूबाजूचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. पण, अद्याप परवानगी न मिळाल्यानं संजय राऊत यांनी सरकारला डिवचलंय.