डोळ्यात अश्रू आणि समोर आगीने खाक झालेली घरं, आनंद नगरमधील रहिवाशी एका झटक्यात रस्त्यावर
डोळ्यासमोर घर पेटलेलं होतं,सर्वच हतबल झाले होते. मुंबईतील अप्पा पाडातील आनंद नगर झोपडपट्टीला आग लागल्याने हजारो संसार रस्त्यावर.
मुंबई | सोमवारी 13 मार्च रोजी मुंबईत अग्नितांडव पाहायला मिळाला. जोगेश्वरी पश्चिमेतील लाकडांच्या दुकानाला आग लागली. त्यानंतर मुंबई उपनगरातील मालाड येथील आप्पा पाडा जवळच्या आनंद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आनंद नगरमधील रहिवाशी या आगीमुळे एका झटक्यात रस्त्यावर आले आहेत. काही तासांपूर्वी आपल्या हक्क्याच्या घरात आनंदाने राहणारे रहिवाशी आता बेघर झालेत. त्यांच्या डोक्यावरचं असलेलं हक्काचं छप्पर हे या आगीने हिरावून घेतलंय. आनंद नगरमध्ये सध्या दुखाचा डोंगर कोसळलाय.
आनंद नगर हा परिसर दाटीवाटीचा. एका सिलेंडरच्या स्फोटामुळे दुसऱ्या सिंलेडरचाही स्फोट झाला. त्यात ही आग भडकली. आगीने रौद्र रुप धारण केलं. आगीचे लोट पाहायला मिळाले. आग लागल्याचं समजताच आनंद नगरमधील रहिवाशी सैरावैरा धावत जीव वाचवत पळू लागले. रहिवाशी खुल्या मैदानात येऊन उभे राहिले. सुदैवाने या आगीत कुणाचीही मृत्यू झाला नाही, पण उभ्या आयुष्यात कमावलेलं एका आगीने हिरावून घेतलं.
समोर लागलेल्या आगीत आपलं घर जळून खाक होताना पाहत असताना या रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. घराला घरपण देण्यासाठी उभं आयुष्य कमी पडतं. घराचे हफ्ते भरण्यात आयुष्य निघून जातं. प्रत्येक जण हक्काचं छप्पर डोक्यावर असावं, यासाठी आयुष्यभर झटत असतो. या आनंद नगरमधील रहिवाशांनीही अशीच उभ्या आयुष्यात मेहनतीने घरं उभी केली. पण नियतीला हे पाहावलं नाही. आग लागली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
घरांना लागलेल्या या आगीत अनेकांचं नुकसान झालं. कुणी भविष्यासाठी पैशांची बचत केली होती, तर कुणी असंख्य स्वप्न उराशी बांधलेली होती. पण या आगीत सर्व स्वप्नांची राखरांगोळी झाली. आपलं सर्वस्व हिरावल्याची भावना रहिवाशांमध्ये आहे. आता हा डोलारा पुन्हा नव्याने उभा करण्यात रहिवाशांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
दरम्यान आता ही आग आटोक्यात आल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या आगीत कशाप्रकारे आनंद नगर झोपडपट्टीची राख झालीय, हे दिसून येतंय. या फोटोतून वस्ती कशी उजाड झाली हे दिसून येतंय. तसेच आगीची दाहकताही लक्षात येते. आता आम्हाला सरकार म्हणून योग्य मदत करावी आणि आमचं पुनर्वसन करावं, अशी मागणी या रहिवाशांची आहे.