Manoj Jarange | सर्वांच्या खुट्या उपटल्या, मनोज जरांगे पाटील यांचा दणका
Manoj Jarange | मराठा समाजाला कुणबी नोंदणी प्रमाणपत्र देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. अंतरवाली सराटीतील पहिल्या उपोषणानंतर वाशीच्या वेशीवर राज्य सरकारला धडकी भरवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांच्या खुट्या कशा उपसल्या याची अस्सल ग्रामीण बाजात उत्तर दिले. आता जरांगे पाटील यांनीच सरकारला खुटी मारल्याचे आंदोलनकर्ते म्हणत आहेत.
मुंबई | 27 January 2024 : मराठा आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या हाताला यश येणार नाहीत, ते नाहक हट्टाले पेटले आहेत, अशी टीका करण्यात येत होती. पण या सर्वांना जरांगे पाटील पूरुन उरले आहेत. मराठा समाजाला कुणबी नोंदी मिळवण्यात आता अडचण उरली नाही. त्यादृष्टीने राज्य सरकारने आदेशच काढल्याने जरांगे पाटील यांच्या चिवट लढ्याच्या पदरात यश पडले. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मिळत कसं नाही, घेऊन दाखवले की नाही, सर्वांच्या खुट्या उपटल्याचे आत्मविश्वासपूर्वक सांगितले. त्यांनी शासनाला खास गनिमी कावा तंत्राने जेरीस आणले. कसे मिळवले त्यांनी आरक्षण?
कुणबीतूनच आरक्षण मिळवणार
कुणबीतूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असा हट्ट मनोज जरांगे पाटील यांनी धरला होता. अनेक कायदे तज्ज्ञ, नामवंत विधीतज्ज्ञ, समाजातील मोठे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मागण्या मान्य होणे अश्यक असल्याचे सांगितले होते. तर ओबीसी एल्गार परिषदेतून पण राज्य सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. आम्हाला खूप त्रास देण्यात आल्या. आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. दबाव तंत्र टाकण्यात आल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी हे आरक्षण कसे मिळवले याची माहिती दिली.
संयमाने केली कुरघोडी
सातत्याने चारही बाजूने डिवचण्यात येत होते. अनेक समाज बांधव पण हा नाहक हट्ट करत आहे. याच्यामुळे समाजातील मुलांवर नाहक केसेस होतील, हाती काही लागणार नाही, असे म्हणत होते. पण आपण आरक्षण मिळवून दाखवले की नाही, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. प्रत्येकवेळी आपल्या विरोधात दबावतंत्राचा वापर होत होता. पण मी त्याला संयमाने उत्तर दिले. संताप केला नाही. त्यांच्या सर्वांच्या खुट्या उपटल्या, असा चिमटा त्यांनी काढला. सर्वच पातळ्यांवर पुरुन उरल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलन संपलेले नाही
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जरांगे पाटील यांनी केवळ स्थगिती दिली आहे. यापुढे सरकार जर शब्दावर कायम राहिलं नाही. पुढे जीआर संदर्भात, सरकारच्या आदेशाविषयी कुठलीही अडचण आली तरी लढत राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारने आता आरक्षणाची पूर्तता केल्याच्या भ्रमात राहू नये, अशी खुटीच जणू त्यांनी मारली आहे.