जालना : मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आजच्या भाषणात बोलल्याप्रमाणे ते आता आंदोलनास्थळावरून मुंबईमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंदोलनस्थळावरून ते आता मार्गस्थ झाले आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या पंधरा ते सोळा दिवसापासून ते उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती काहीश खालावलेली दिसत आहे. जरांगे यांना इतर मराठा बांधव मुबंईच्या दिशेने जाण्याचा आग्रह सोडावा, अशी विनंती करत आहेत.
मनोज जरांगे आता प्रकृती ठिक नसल्याने ते चालत न जाता गाडीमध्ये बसले आहेत. मराठा बांधवांचा मोठा जमाव त्यांच्यासोबतस असलेला पाहायला मिळत आहे. जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे, कारण रात्रीपासून त्यांनी पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मनोज जरांगे यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.
छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी केवळ समाजाचा आहे. समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागले.