Maratha Reservation : ‘…तर मग मला सांगू नका’; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला!
Manoj Jarange Patil : राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून दुसऱ्यांदा उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचा सातवा दिवस आहे. राज्यातील एकंदरित परिस्थिती पाहता जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाबाबत इशारा दिला आहे.
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत चालला आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र सरकारने कोणतीही पाऊलं उचलली नाहीत त्यानंतर परत एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस असून सरकारकडून कोणतीही मोठी हालचाल दिसली नाही. राज्यभर हे आंदोलन उग्र रूप धारण करत असलेलं पाहायला मिळत आहे. राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली गेली असून ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत हिंसा करू नका असं आवाहन सर्वांना केलं. मात्र यावेळी बोलताना जरागेंनी मुख्यमंत्र्यांना इशाराही दिला.
मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मराठे शांत झालेत, तुम्ही पटकन आरक्षण द्या. मराठे सर्व शांत होतील का? तुम्ही अर्धवट आरक्षण देऊ नका. अर्धवट दिलं तर मला सांगू नका, मराठवाड्यातील भाऊ तुमचे आहेत. महाराष्ट्रातील तुमचे नाही का. मराठवाड्यातील माझे आहेत मग पश्चिम महाराष्ट्रातील माझे नाही का. त्यामुळे सरसकट द्या. अर्धवट भूमिका नकोच. कुठूनही पुरावे घ्या, पण आरक्षण महाराष्ट्र भर द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मी पाणी प्यायल्यानंतर मराठा समाज शांत झाला. मी त्यांना आवाहन करतो उद्रेक करू नका. जाळपोळ करू नका. मी लढतोय. तुम्हीही लढा. लढणाऱ्या मरणाला भिणार नाही. मी पाणी प्यायल्यापासून उठून बसलो. मी तुमच्यासमोर बोलतोय. समाजाने पाणी प्या म्हटलं. मी पाणी प्यायलं. आता तुम्ही शब्दाला पक्कं जागा. साखळी आणि आमरण उपोषण जसं सहन होईल तसं सुरू ठेवा. राजकीय नेत्यांना गावात येऊ देऊ नका, तुम्हीही त्यांच्याकडे जाऊ नका, असं जरागेंनी मराठ समाजाला सांगितलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या तरूणांना आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका नाहीतर वेगळ निर्णय घ्यावा लागेल, असंही जरांगे-पाटील म्हणाले.