नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी एक दिवसाचा वेळ दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दिला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन सरकारला आज एक दिवसाचा वेळ दिला. सरकारने आज रात्रीपर्यंच सगेसोयरीच्या मागणीचा जीआर तयार करावा, आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जीआर तयार करुन द्या. अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघेल, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार, असं मनोज जरांगे ठामपणे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगेचा मेसेज वाचला. “सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या. असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केलीय. मग एवढं झालंय तर मग अध्यादेश का काढला नाही. काही करा. रात्रीतून अध्यादेश काढा. हवं तर आजची रात्री इथेच काढतो. आम्ही २६ जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही. इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो. तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. जे जे निर्णय घेतले. आदेश काढले तेवढे द्या. मी वकिलांशी चर्चा करून शब्दा शब्दावर किस पाडतो. अभ्यास करतो रात्रभर. तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत. आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण उपोषण सोडणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
“न्यायासाठी आपण इथे आलो आहोत. आपले पोरं या शहरात उभे आहेत. लेकराबाळाला पाणी लागलं तर पाणी द्या. त्यांना साथ द्या. गोरगरीबांच्या मराठ्यांना डिवचलं तर महाराष्ट्रातील मराठासमाज मुंबईत येईल हे लक्षात घ्या. आपण आडमुठेपणा करायला आलो नाही. न्यायासाठी आलोय. आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मराठ्यांनी घरात थांबू नका. झाडूनपुसून मुंबईत या. कोरोडोने या. जे निर्णय घेतले त्याचे पत्रक काढा. डेटाही द्या. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढा. उद्या दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत आम्हाला अध्यादेश द्या. नाहीतर आझाद मैदानात येणार आहोत. आम्ही इथून उठणार नाही. मला डेटा पाहिजे. अध्यादेश हवा. केसेसचं पत्र हवं, मोफत शिक्षण आणि नोकरीत राखीव जागा ठेवण्याचा निर्णय पाहिजे”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
“अध्यादेश आला म्हणजे तो वाचूनच निर्णय घेणार. त्याआधी निर्णय घेणार नाही. आझाद मैदानाचा निर्णय उद्या सर्वांनी बसून घ्यायचा आहे. तुमच्याशिवाय निर्णय घ्यायच नाही. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. “कुणीही आता आझाद मैदानावर जाऊ नका. आज इथेच थांबा. आराम करा. मी वकिलांशी चर्चा करतो”, असंदेखील मनोज जरांगे म्हणाले.
“सग्यासोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहू शकत नाही. राहिला तर तुम्ही माझ्याकडे या. पुन्हा ताकदीनं आंदोलन उभं करेन. पण एकही मराठा वंचित ठेवणार नाही. या ५४ लाख नोंदीचा डेटा हवा. सग्यासोऱ्याचा आदेशच काढला नाही. चिवटेंना विनंती आहे. तुम्ही प्रयत्न केला. आम्ही त्यासाठीच इथे आलो. आम्हाला हौस नाही. आम्ही कष्टकरी लोक आहोत. आमची इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्रीच हा अध्यादेश द्यावा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.