मुसळधार पावसाचे राज्यात सात बळी; आजही पावसाचे थैमान, या जिल्ह्यांना दिला IMD ने ऑरेंज अलर्ट
Mansoon Update : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता पावसाने राज्यात आघाडी उघडली आहे. पावसाने नदी-नाले एक झाले आहे. त्यांना पूर आला आहे. अशावेळी तुमचे भलते धाडस अंगलट येऊ शकते. आजही पाऊस राज्याला झोडपण्याची शक्यता आहे.
आजही राज्यात दमदार पावसाचा सांगावा आला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्हा वगळता पावसाने राज्यात जोर बैठका घातल्या. पुणे, मुंबई आणि आसपासचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार दिसून आला. पावसाने नदी-नाले एक झाले आहे. त्यांना पूर आला आहे. त्यामुळे महापूरातून जाण्याचे धाडस अंगलट येऊ शकते. राज्यात या कोसळधारेमुळे सात जणांचा मृत्यू ओढावला आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय
मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागानुसार, राज्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात कोसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूरकरांनो आज काळजी घ्या
हवामान विभागानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात गड गडासह पाऊस पडेल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी जिल्ह्यात वरुण राजाची कृपा दिसू शकते.
मुंबईसह कोकणात पावसाचा जोर
IMD नुसार कोकणला पावसाचा तडाखा दिसू शकतो. या भागासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसेल. मुंबईसहीत उपनगरात पावसाचा जोर दिसेल. ठाणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सात जणांचा मृत्यू
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सहा जणांसह राज्यभरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. डेक्कन परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अभिषेक अजय घाणेकर, आकाश विनायक माने आणि शिवा परिहार अशी मृतांची नावे आहेत. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. शिवाजी भैरट असे मृताचे नाव असून तो मुळशी येथील रहिवासी आहे. या घटनेत मुळशी येथील जितेंद्र जांभुर्पाने हे जखमी झाले आहेत.