Mantralaya : मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना आजपासून प्रवेश, दुपारी 2 नंतर फोटो पाससह एन्ट्री मिळणार
आजपासून सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 पासून नागरिकांना मंत्रालयात प्रवेशाची मुभा देण्यात आलीय. गृह विभागाकडून नागरिकांना मंत्रालयातील प्रवेशाबाबतचा जीआर नुकताच जारी करण्यात आलाय.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयात (Mantralaya) सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र, आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसंच जवळपास 90 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतलेले आहेत. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने महत्वाचा निर्णय घेतलाय. आजपासून सर्वसामान्य नागरिकांना (Common Man) मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 पासून नागरिकांना मंत्रालयात प्रवेशाची मुभा देण्यात आलीय. गृह विभागाकडून नागरिकांना मंत्रालयातील प्रवेशाबाबतचा जीआर नुकताच जारी करण्यात आलाय. त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरु करण्यात आलीय.
कोरोना महामारीपासून मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून नागरिकांची अनेक कामं रखडली, तसंच अनेकदा त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आता मंत्रालयात नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय. आता त्या त्या विभागातील अडलेली महत्वाची कामं होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.
मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गूल
मंत्रालयासमोर अनेक मंत्र्यांचे बंगले आहेत. या बंगल्यात मंगळवारी संध्याकाळी अचानकपणे वीज पुठवठा खंडीत झाला. साधारण तासाभर मंत्र्यांच्या बंगल्यात वीज नव्हती. त्यामुळे विविध कामासाठी आलेल्या नागरिकांनाही त्याचा फटका बसला आहे. महत्वाची बाब म्हणजे मंगळवारी सकाळीही मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अजून काही मंत्र्यांच्या बंगल्याचा समावेश आहे.
हसन मुश्रीफांची नितीन राऊतांकडे तक्रार, चौकशीची मागणी
मंत्र्यांच्याच बंगल्याची बत्ती गूल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. ऊर्जा खात्याच्या कारभारावर दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात होती. तसंच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने संपर्क केला जात होता, मात्र तिथूनही उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा खंडीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलून चौकशी करण्याची मागणी हसन मुश्रीफ यांनी केलीय.