‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ विरारमध्ये मनुस्मृतीसह साध्वी प्रज्ञा यांच्या प्रतिमेचे दहन
विरारमध्ये भाजपच्या मध्य प्रदेशातील खासदार साध्वी प्राज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोसह मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले आहे.
विरार : विरारमध्ये भाजपच्या मध्य प्रदेशातील खासदार साध्वी प्राज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्या फोटोसह मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले आहे. विरार पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनवेलपाडा तलावासमोर आज सायंकाळी 6 च्या सुमारास संविधान कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी “शूद्र को शूद्र कहे तो गुस्सा क्यों आता है? नासमझी यही उसका कारण है” (क्षुद्राला क्षुद्र म्हटलं तर त्यांना वाईट का वाटतं? अज्ञान हे त्यामागचं कारण आहे) असं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य मनुस्मृतीच्या विचारधारेतील आहे, असा दावा करत आज मनुस्मृती दहन दिवसाचे औचित्य साधून संविधान कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विरारमध्ये मनुस्मृती आणि प्रज्ञा सिंह यांच्या फोटोचे दहन करत निषेध व्यक्त केला. या निदर्शन आंदोलनात बहुजन पँथर, रिपाई (आठवले गट), राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
साध्वी प्रज्ञा ‘शूद्रांवर’ घसरल्या
मध्य प्रदेशच्या सिहोर येथे 13 डिसेंबरला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी जाती व्यवस्थेचे समर्थन केले. प्राचीन काळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्याला वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं कारण काय आहे? जातीव्यवस्थेबाबत असलेल्या अज्ञानातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले होते.
‘राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे’
राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार, असा सवाल साध्वी प्रज्ञा यांनी उपस्थित केला.
साध्वी प्रज्ञांचा ममता बॅनर्जींवर निशाणा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला होता. यावरून साध्वी प्रज्ञा यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य केले. आपली पश्चिम बंगालमधील सत्ता जाणार याची जाणीव झाल्याने ममता बॅनर्जींना वैफल्य आले आहे. आगामी वर्षात होणारी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकून भाजप याठिकाणी ‘हिंदू राज’ आणेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली
‘कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
विरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या