महाड येथील राजकीय आंदोलनात जितेंद्र आव्हाडांकडून एक चूक घडली. ही चूक अनावधानाने झालेली असली तरी सत्ताधाऱ्यांना मात्र आयता मुद्या मिळाला. राज्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आव्हाडांनी माफी मागितली आहे. विरोधक या मुद्याचे भांडवल करत असल्याचा आरोप करत त्यांनी असे फटकारले आहे.
काय आहे प्रकरण
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोकांचा समावेश करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी बुधवारी महाडमधील चवदार तळे येथे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आव्हाडांकडून एक चूक घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला कागद त्यांच्याकडून फाडला गेला. हे राजकीय आंदोलन त्यांच्या अंगलट आले. त्यावरुन राज्यात आव्हाडांविरोधात आंदोलन तापले.
आव्हाडांनी मागितली माफी
या प्रकारानंतर राज्यभरात संताप उसळला. ठिकठिकाणी आंदोलने झाली. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रोष व्यक्त झाला. महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरु लागली. झालेल्या प्रकाराबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली. पण राजकीय आंदोलन चांगलेच तापले आहे. प्रत्येक शहरात आव्हाडांविरोधात आंदोलन सुरु आहे.
आव्हाडांचे विरोधकांना खडे बोल
जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात आता त्यांच्या विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर(X) एक पोस्ट शेअर केली आहे. “काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली. १८५ km चा प्रवास करुन मी माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का? तुमचे सारखे ह्या प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिले मी आपले आभारी आहे मरण पत्करेन पण समाजात जाती द्वेष आणि स्त्री द्वेशाची बीजे रोवणाऱ्या मनुला विरोध करू. बापाची शिकवण विसरणार नाही.” असे त्यांनी म्हटले आहे.
काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली १८५ km चा प्रवास करुन मी माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का.
तुमचे सारखे ह्या प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिले मी आपले आभारी आहे
मरण पत्करेन पण समजत जाती द्वेष आणि स्त्री द्वेशा ची बीजे रोवणाऱ्या मनु ला… https://t.co/IMWjNzhgy9— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 30, 2024
सुषमा अंधारे आव्हाडांच्या पाठिशी
सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन सर्वांना ज्ञात आहे. शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली असल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. पण तरीही याच्या आडून राजकारण करणाऱ्या आणि बाबासाहेब यांच्याबद्दल बेगडी प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांसाठी एक सवाल त्यांनी विचारला. जर जितेंद्र आव्हाड्यांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर आव्हाड ज्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं मत काय आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.