सर्वात मोठा ट्विस्ट : मराठा समाजाकडून ज्यांचं नाव चर्चेत होतं, तेच थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीला
लोकसभा निवडणुकीआधी बैठकांवर बैठका होत असून अनेक फेरबदल पाहायला मिळत आहेत. अशातच मराठा समाजाकडून ज्यांचं नाव निवडणुकीसाठी चर्चेत आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कोण आहेत ते जाणून घ्या.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असताना आता मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथून उमेदवारी लढवण्यास इच्छूक आहेत. विनोद पाटील यांनी याआधीच लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पण या बैठकीत राडा झाला. या राड्यानंतर आता विनोद पाटील मुंबईत पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. विनोद पाटील छत्रपती संभाजीनगरमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून विनोद पाटील यांना उमेदवारीची संधी मिळते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
असं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजप नेते भागवत कराड, अतुल सावे, भाजपचे अनेक पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी आग्रही मागणी केली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सुटणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता विनोद पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधून जागा मिळते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विनोद पाटील कोण आहेत?
विनोद पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, आर.आर.पाटील फाऊंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान या दोन्ही संस्थाचे ते अध्यक्ष आहेत.