महाराष्ट्रात जिंकलो, दिल्ली जिंकण्यासाठी साथ द्या, मराठा समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मराठा आरक्षण याचिकाकर्ते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तसेच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली.
मुंबई : मराठा आरक्षण याचिकाकर्ते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तसेच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली. शिवसेना भवनात झालेल्या या भेटीवेळी मराठा मोर्चाचे अनेक समन्वयक उपस्थित होते. हायकोर्टाने मराठा आरक्षण कायम ठेवलं. त्यामुळे मराठा मोर्चाला पाठिंबा दिल्याबद्दल विनोद पाटील आणि मराठा मोर्चाचे समन्वयक विविध राजकीय पक्षांचे आभार मानत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विनोद पाटील यांना पेढा भरवून अभिनंदन केलं.
यावेळी विनोद पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे आभार मानतो. मराठा मोर्चाला शिवसेनेने पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमुळे वेळोवेळी मदत मिळाली. येणारी पीढी मराठा आरक्षणाचा इतिहास कायमस्वरुपी लक्षात ठेवेल. या इतिहासात शिवसेनेचं आणि उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. न्यायालयीन लढा असो किंवा सभागृहात मतदान करणं असो, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने पाठिंबा दिला. या सर्व लढ्यात पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो”
कोणत्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही, पण तरीही मराठा आरक्षण विरोधकांचा विरोध कायम आहे. हायकोर्टानेही आरक्षण मान्य केलं. मात्र तरीही विरोध होत आहे. आता आम्ही सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केलं आहे. तिथे शिवसेनेच्या 18 खासादारंनी आवश्यक ती मदत दिल्ली दरबारी करावी, अशी विनंती विनोद पाटील यांनी केली.
याशिवाय मराठा मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं असो वा अन्य प्रश्न असो, ते सोडवण्यासाठी शिवसेनेने साथ द्यावी, अशीही भूमिका विनोद पाटील यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली.