EXCLUSIVE: मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू झालं आहे. मात्र आता त्याच्या कायद्याच्या कसोटीबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकणं मुश्किल आहे. आधीच्या दोन आयोगाबद्दल सरकारने […]
मुंबई: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू झालं आहे. मात्र आता त्याच्या कायद्याच्या कसोटीबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकणं मुश्किल आहे. आधीच्या दोन आयोगाबद्दल सरकारने काय कार्यवाही केली ते समजत नाही. आधीच्या दोन्ही आयोगानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलं होतं. त्यामुळं फक्त सध्याच्या गायकवाड आयोगानं आरक्षणाबाबत शिफारस केली आहे. सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण लावून दिलं आहे”
याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी तीन आयोग आले, ते का स्वीकारले गेले नाहीत याची ठोस कारणं दिलेली नाही. त्यामुळं दोन विरुद्ध एक अशा मतानं हे आरक्षण टिकेल असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेनुसार राज्य आयोगानं केंद्रीय आयोगाचं मत विचारात घ्यायला हवं होतं, ते घेतलेलं दिसत नाही. त्यामुळं कायदेशीर आठकाठी निर्माण होऊ शकते. सामाजिक, शैक्षणिक, मागासलेला प्रवर्ग अशी ओळख सरकारनं दिली आहे. त्यामुळं मंडल यादी आणि ही यादी एकच होऊन 43 टक्क्याच्या आरक्षणाबाबत ओबीसी आक्रमक होऊ शकतो. सरकारनं यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळं सरकारच्या बिलामुळं राज्यात शांतता राहिल असं वाटत नाही. अहवालाच्या शिफारशींबद्दल कोर्टच निर्णय घेऊ शकतं, असंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.
मराठा आरक्षण लागू
दरम्यान, आजपासून मराठा आरक्षण लागू झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 डिसेंबरला जल्लोष करा असं मराठा समाजाला सांगितलं होतं. त्यानुसार सरकारने मराठा आरक्षण लागू केलं. मराठा आरक्षणाचा शासन आदेश आज जारी झाला. आजपासून नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असेल.