मुंबई | 25 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा लोणावळ्याला पोहोचला आहे. हा मोर्चा आज रात्री वाशीला पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांचा मोर्चा उद्या मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला जाणार आहे. त्यांच्या मोर्चात लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही मनोज जरांगे आझाद मैदानावर जाण्यास ठाम आहेत. मनोज जरांगे यांचा भव्य मोर्चा मुंबईत आला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय सरकारदेखील या पार्श्वभूमीवर सतर्क आहे. त्यामुळे राज्य सरकारचं शिष्टमंडळ नवा जीआर घेऊन मनोज जरांगे यांच्या भेटीला निघाला आहे. या नव्या जीआरमध्ये नेमकं काय आहे ते सध्या तरी समोर आलेलं नाही. पण या जीआरमध्ये जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीचा विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. पण त्यांनी मुंबईत येऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यानंतर आता मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत. मंगेश चिवटे, विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे हे दोघेजण एक महत्त्वाचा जीआर घेऊन मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या दिशेला निघाले आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची विनंती केली होती. ती आरक्षणाची पूर्तता केल्याचा जीआर मंगेश चिवटे यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी सगे-सोयरेचा जो मुद्दा उपस्थित केला होता त्याची सुद्धा या जीआरमध्ये पूर्तता केल्याची माहिती समोर आली आहे. हाच जीआर मंगेश चिवटे आणि सुमंत भांगे मनोज जरांगे जिथे असतील तिथे देणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मागणीची पूर्तता केल्याचं जीआरमधून दाखवण्यात येणार आहे. हा जीआर पाहिल्यानंतर जरांगे काय भूमिका घेतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.