Special Report : 19 बंगल्यांवरुन पुन्हा रश्मी ठाकरे यांच्याकडे मोर्चा, किरीट सोमय्या यांची पोलिसांत धाव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कागदपत्रात फेरफार करुन 19 बंगले पाडल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.
मुंबई : नव्या वर्षातही किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर ठाकरे कुटुंबच आहे. कारण सोमय्यांनी पुन्हा एकदा अलिबागेतल्या 19 बंगल्यावरुन आरोप केलेत. पोलिसांत तक्रार देत, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्यांनी केलीय. त्यातच ग्रामविकास मंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा, ठाकरे कुटुंबाकडे वळवलाय. अलिबागच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी, पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले घेतले. पण निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात हे बंगले लपवले. त्यानंतर घोटाळा दाबण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करुन बंगले पाडल्याचा आरोप करत, सोमय्यांनी पोलिसांत धाव घेतली. रेवदंडा पोलिसांत तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्यांनी केलीय.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, सोमय्यांनी 19 बंगल्यावरुन आरोपांची राळ उडवली होती. आता सरकार बदलताच, सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झालेत. कोर्लई गावात अन्वय नाईकांनी 2009 मध्ये बंगले रिसॉर्टसाठी बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही जमीन रश्मी उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकरांनी खरेदी केली. प्रत्यक्षात कोर्लई गावात 19 बंगले नाहीत, तर घरांचा पाया किंवा पाडकामाचे अवशेष आहेत.
मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कागदपत्रात फेरफार करुन 19 बंगले पाडल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. 8 दिवसांत अहवाल येणार असल्याची माहितीही सोमय्यांनी दिलीय.
विशेष म्हणजे बंगल्यांच्या आरोपांवरुन गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोमय्या कोर्लई गावात आले होते. त्याही वेळी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
आता तर सोमय्यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात 420चाच गुन्हाच दाखल होईल, असा दावा केलाय. तर आरोप केलेले आणि शिंदे गटात गेलेल्यांचं काय ?. प्रताप सरनाईकांचा पाठपुरावा का थांबला असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी सोमय्यांना केलाय. गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून 19 बंगल्यांचं प्रकरण शांत होतं. पण आता सत्तांतरानंतर 6 महिन्यांतच, सोमय्यांनी 19 बंगल्यावरुन ठाकरेंना टार्गेट केलंय.