मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात गुरुवार 19 जानेवारी रोजी मेट्रो 2 अ मार्गिकेच्या वळनई – अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 च्या गोरेगाव पूर्व – गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. या दुसऱ्या टप्प्याने मुंबईची पहिल्या मुंबई मेट्रो वनच्या स्थानकांशी कनेक्शन झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे. त्यामुळे आठवडाभरातच मेट्रोच्या प्रवासी संख्येने दहा लाख प्रवाशांचा टप्पा गाठला आहे.
मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून दहा लाखाहून अधिक मुंबईकर प्रवाशांनी मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 ने प्रवास केला आहे. आता या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून मेट्रो मार्ग वन सोबत जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो वनच्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना त्याचा लाभ होत आहे.
पहिल्या टप्प्यापासून 1 कोटीहून अधिक प्रवासी टप्पा पार रेल्वेच्या
2 एप्रिल 2022 रोजी पहिला टप्पा सुरू झाल्यापासून, मेट्रो 2 अ आणि 7 ने आतापर्यंत जवळपास १ कोटींहून अधिक मुंबईकरांना अखंड सेवा देण्यात यश मिळवले आहे. आजपर्यंत जवळपास 1,00,03,270 इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वर एकूण 22 ट्रेन दररोज 245 मेट्रो सेवा पुरवत आहेत.
20 हजाराहून अधिक मुंबई वन कार्डची विक्री
मेट्रो प्रशासनाने सर्व प्रवासी वाहतूक साधनांना एकाच कॉमन कार्डवर आणले आहे. त्यासाठी कॉमन मोबिलीटी कार्डद्वारे विकत घेण्याची सोय केली आहे. मुंबई वन कार्ड प्रवाशांना सलग प्रवासासाठी मदत करत असल्याने प्रवाशांना वेगवेगळे तिकीट काढण्याची गरज राहीलेली नाही. लवकरच हे कार्ड देशातील सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी देखील वापरले जाऊ शकते. या कार्डचा वापर करून शॉपिंगसह मेट्रो, बेस्टच्या बसची तिकिटे खरेदी करता येणार आहे. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे मुंबई वन कार्ड उपलब्ध आहेत.
मुंबई वन कार्ड प्रत्येक ट्रीपवर 5-10 % सूट
सोमवार ते शनिवार – 5%, रविवार -10% आणि राष्ट्रीय सुट्ट्या – 10%.
75 हजारांहून अधिक प्रवाशांनी केले मेट्रो वन ॲप डाऊनलोड
मुंबई वन कार्डप्रमाणेच 75,739 वापरकर्त्यांनी (61,742 Android आणि 13997 IOS) मुंबई वन मोबाइल ऍप्लिकेशन डाउनलोड केले. या ऍप्लिकेशनद्वारे प्रवासी त्यांच्या ठराविक अंतराच्या तिकिटांसाठी QR कोड तयार करू शकतात.
प्रवाशांसाठी एक डीजीटल क्रांती
मुंबई वन कार्ड आणि ॲप ही मुंबईकरांना सलग तसेच विनाव्यत्यय प्रवासासाठी एक डीजीटल क्रांती आहे. आता मेट्रो मुंबईकरांची एक नवीन लाईफलाईन बनत आहे. मुंबईकर आता प्रवासासाठी खाजगी वाहनांऐवजी इको फ्रेंडली मेट्रोकडे वळत असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.