मुंबई : पश्चिम उपनगरातील मेट्रो – 7 आणि मेट्रो 2 (अ ) या नुकत्याच सुरू झालेल्या दोन मेट्रो मार्गिकाने रोज प्रवास करणाऱ्या 1.4 लाख प्रवाशांना आता महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (MMMOCL) विशेष प्रवास सवलत योजना जाहीर केली आहे. मुंबई मेट्रो वन कार्डच्या मार्फत ही विशेष सवलत मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार 30 दिवसांच्या कालावधीत 45 वेळा मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 15 टक्के सुट तर 60 वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 20 टक्के सूट मिळणार आहे.
मुंबई मेट्रो मुंबईतील विविध स्थानकावर प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी ‘अमर्याद ट्रीप पास’ (Unlimited trip pass) ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार एक दिवसीय अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये 80, तर 3 दिवसांच्या अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये 200 इतके असणार आहे.
‘मुंबई वन कार्ड’ असे मिळवा
मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना ‘मुंबई वन’ हे नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काऊंटर आणि कस्टमर केअर काउंटरवर काही कागदपत्रांची पूर्तता करताच अत्यंत सहज मिळत आहे. तसेच हे कार्ड रिचार्ज करून आपल्याला वॉलेटमधील रक्कम तिकीटांशिवाय इतर खरेदीसाठी वापरता येते. या कार्डचा वापर रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील करता येणार आहे.
‘मुंबई वन कार्ड’च्या माध्यमातून सध्या सोमवार ते शनिवार पाच टक्के, रविवारी आणि राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी दहा टक्के सवलत आहे. मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी या नवीन ट्रीप पास योजनेमुळे तिकीट प्रक्रिया ही अधिक सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल. त्यासोबतच या योजनेमुळे मुंबई मेट्रो प्रवासादरम्यान जास्तीतजास्त प्रवाशांना ‘मुंबई वन’ हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.
या सुविधेबाबतची वैशिष्टे आणि सुचना
• 45 आणि 60 ट्रीप पास हा खरेदीच्या तारखेपासून 30 दिवसांसाठी वैध राहील.
• अनलिमिटेड ट्रीप पास – 80 रुपये ( वैधता एक दिवस ), 200 रुपये ( वैधता तीन दिवस )
• 1 ट्रीप – एकेरी प्रवास
• पास नुसार मुंबई मेट्रोने प्रवास हा केवळ पास मध्ये निश्चित केलेल्या गंतव्य स्थानकांदरम्यानच्या प्रवासासाठी मर्यादित असतील.
• मुंबई वन कार्ड हरवल्यास कार्डमधील शिल्लक रक्कम परत मिळविता येत नाही.
• मुंबई वन कार्ड खराब झाल्यास, काम करत नसल्यास किंवा गहाळ झाल्यास नवीन कार्डसाठी रु. 100 इतके शुल्क आकारले जाते.
• ट्रीप पासेस फक्त मुंबई वन नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी वैध आहेत