मोठी आनंदवार्ता, तुमच्या घराचे स्वप्न म्हाडा पूर्ण करणार, लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी
MHADA Lottery 2025 : तुमच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडा तुमचे आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावली आहे. लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी लागणार आहे. तेव्हा अर्ज भरण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी तयार राहा.

म्हाडा लवकरच तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हाडाची लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी लागणार आहे. नुकतीच म्हाडाने कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीकरिता सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले होते. ही सोडत निघाली. त्यात अनेकांचा हिरमोड झाला. पण त्यांना आता निराश होण्याची गरज नाही. कोकण मंडळाने पुन्हा नवीन घरांची योजना आणली आहे.
चितळसर येथील ११७३ घरांचा समावेश
म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांना आता निराश होण्याचे कारण नाही. येत्या काही महिन्यांत म्हाडाचे कोकण मंडळ सुमारे २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे. ना हरकत प्रमाणपत्रानंतर घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.




म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ३० हजार घरांची सोडत काढण्याचे नियोजन असून दर तीन ते सहा महिन्यांत म्हाडाच्या कुठल्या तरी मंडळाची सोडत काढण्याचे प्रस्तावित आहेत. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन सोडत काढल्या असून सुमारे दहा हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे. आता या वर्षी पुन्हा एकदा सुमारे दोन हजार घरांची सोडत काढण्याची कोकण मंडळाची तयारी आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे.
ठाणे पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र कधी?
चितळसर येथे म्हाडाने २२ मजल्याच्या ७ इमारती तयार केल्या आहेत. पण या परिसराला पाणी आणि रस्त्याची समस्या आहे. ठाणे महानगर पालिकेने अद्याप या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने सोडतीचे काम रखडले आहे. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळताच येथील घरे सुद्धा लॉटरीमध्ये येतील आणि अधिक लोकांना त्याचा लाभ होईल असे सांगितले जाते.