लॉकडाऊनमुळे भयभीत कामगारांची रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी; रेल्वे म्हणते, पॅनिक होऊ नका!

| Updated on: Apr 14, 2021 | 11:58 AM

राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागणार आहेत. (Migrants rush to Mumbai railway stations to catch trains fear of lockdown)

लॉकडाऊनमुळे भयभीत कामगारांची रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी; रेल्वे म्हणते, पॅनिक होऊ नका!
passengers
Follow us on

मुंबई: राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागणार आहेत. हे निर्बंध 1 मे पर्यंत असणार असले तरी त्यात वाढ होण्याची भीती असल्याने हातावर पोट असलेले कामगार भयभीत झाले आहेत. त्यामुळे या कामगारांनी चंबूगबाळं आवरत थेट रेल्वे स्थानक गाठलं आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. अचानक झालेल्या या गर्दीमुळे कामगार अधिकच भयभीत झाले असून रेल्वेने पॅनिक होऊ नका, गाड्या सुरूच राहतील. सर्वांना प्रवास करता येईल, असं आवाहन केलं आहे. (Migrants rush to Mumbai railway stations to catch trains fear of lockdown)

मध्ये रेल्वेचे मुख्य पीआरओ शिवाजी एम. सुतार यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी पॅनिक होऊ नये. रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये. रेल्वे वेटिंग लिस्टवर लक्ष ठेवून आहेत. जशी गरज असेल तशा अतिरिक्त स्पेशल ट्रेन सोडण्यात येईल. गाडी सुटण्याच्या 90 मिनिटे आधीच स्टेशनवर या, विनाकारण स्टेशनवर गर्दी करू नका, असं आवाहन सुतार यांनी प्रवाशांना केलं आहे.

230 समर स्पेशल सोडणार

आतापर्यंत मध्य रेल्वेने 230 समर स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. त्याशिवाय आम्ही अधिक अतिरिक्त गाड्या सोडणार आहोत. या सर्व स्पेशल ट्रेनमधून केवळ कोविड नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कन्फर्म तिकिट असणाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. उन्हाळा असल्याने रेल्वे स्थानकांवर सामान्य गर्दी आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका. लोकांनी पॅनिक होऊ नये. दरवर्षी उन्हाळ्यात अशी गर्दी रेल्वे स्थानकात होत असते. आम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत आहोत. लोकांनी त्रस्त होऊ नये. अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ट्रेन बंद होणार नाही

ट्रेन बंद होणार नाहीत किंवा गाड्या कमी करण्यात येणार नाही. उलट गरज पडल्यास अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊनच्या भीतीने अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने तातडीने ही माहिती जारी केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनीही गाड्यांची कपात केली जाणार नाही आणि मागणी वाढल्यासा अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार असल्याचं प्रवाशांना आश्वासन दिलं होतं. प्रवाशांकडून प्रवास करण्यासाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. प्रवाशांकडून असा कोणताही रिपोर्ट मागण्यात येणार नाही. फक्त प्रवाशांनी कोरोना नियमांचं पालन करूनच प्रवास करणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी

दरम्यान, महाराष्ट्रात आज रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे पर्यंत 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 144 कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली असून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहनही केलं आहे. (Migrants rush to Mumbai railway stations to catch trains fear of lockdown)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना पत्रं

मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या; ऑक्सिजनचा तुटवडा राज्य सरकारचा नाकर्तेपणा: फडणवीस

LIVE | भाजपची भूमिका भारत भालकेंविरोधात नाही, सरकारविरोधात आहे : गोपीचंद पडळकर

(Migrants rush to Mumbai railway stations to catch trains fear of lockdown)