कोल्हा’पुरा’चा मुंबईलाही फटका, मुंबई-ठाणे परिसरात लाखो लिटर दुधाचा तुटवडा
मुसळधार पावसामुळे वाहतूक बंद झाल्याने कोल्हापूरहून मुंबईला दूध पुरवठा झालेला नाही. गोकुळचे 7-8 लाख लिटर, तर वारणाचे 3-4 लाख लिटर दूध मुंबईत येते.
कोल्हापूर : मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे कोल्हापुरातल्या (Kolhapur Floods) दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचं संकलन थांबवलं आहे. यामुळे मुंबई, ठाणे, वसई-विरार परिसरात दुधाचा तुटवडा (Milk Scarcity) जाणवत आहे.
कोल्हापूरहून गोकुळचे 7-8 लाख लिटर, तर वारणाचे 3-4 लाख लिटर दूध मुंबईत येते. त्यासोबतच चितळे आणि इतर कंपन्यांचे 2-3 लाख लिटर दूध शहरात दाखल होते. मुंबईत दूध दाखल झाल्यानंतर या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात पुरवठा केला जातो. मात्र आज हा दूध पुरवठा झाला नाही.
मुंबईची दररोज दुधाची गरज ही 80 लाख लिटरची आहे. यामध्ये अमूल 12 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते. कोल्हापूर- सांगलीमधून मुंबईत दररोज 13 लाख लीटर दूध दाखल होते. गोकुळ 6 लाख लिटर, वारणा 2 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते. दररोज 55 लाख लिटर दूध पॅकिंग पिशव्यांमधून येतं, तर 25 लाख लिटर सुट्या दुधाचा पुरवठा होतो.
महापुरामुळे मार्ग बंद झाल्याने गोकुळ संघाचं दूध संकलन मंगळवार-बुधवारी बंद ठेवण्यात आलं होतं. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने बुधवारी मुंबईला सव्वा दोन लाख लिटर तर पुण्यात सव्वा लाख दुधाचा तुटवडा भासल्याची माहिती आहे. गोकुळबरोबर वारणा, शाहू, स्वाभिमानी, शिरोळ, प्रतिभासह अन्य दूध संघांना पुराचा मोठा फटका बसला आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे (Panchaganga River) पाणी घुसलं आहे. शहरात पाणी घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे. तसेच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.