मुंबई– राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचे सरकार आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला त्यावरुन टीकाही झाली. त्यानंतर अधिवेशनापूर्वी 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता त्यानंतर चर्चा सुरु आहे ती मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांची. नेहमीच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या सरकारी निवासस्थानाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र यावेळी रामटेक हा बंगलाही सध्या चांगलाच चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे. शपथविधी झाल्यानंतर मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचा बंगला विचारण्यात आला होता. दीपक केसरकर (Deepak Kesarkar)सोडता कोणत्याही मंत्र्याने रामटेक बंगला घेण्याची इच्छा व्यक्त केली नाही. हा बंगला नको, अशी भूमिका घेणाऱ्यांच्या मनात एक अंधश्रद्धा असल्याचे सांगण्यात येते. या बंगल्यात कोणताही मंत्री राहतो, त्याची मंत्रिपदाची खुर्ची तरी जाते किंवा एखाद्या घोटाळ्यात त्याचे नाव तरी येते, अशी वंदता आहे. यंदाच्या मंत्रिमंडळात या रामटेक बंगला शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आला आहे.
शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ज्यांना हा बंगला मिळाला आहे, त्यांचे मात्र वेगळेच म्हणणे आहे. या बंगल्याबाबत इतरांच्या मनात काहीही असले तरी या बंगल्यात शरद पवार यांचेही वास्तव्य होते, असे केसरकर यांचे म्हणणे आहे. आज देशातील मोठ्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव घेतले जाते, त्यामुळे या बंगल्यात राहणाऱ्याला मंत्रीपद सोडावेच लागते असे नाही, तर या बंगल्यातील वास्तव्याचा फायदाही होऊ शकतो, असेच त्यांना सुचवायचे असावे. यात बंगल्यात शंकरराव चव्हाण राहिले होते, ते पुढे मुख्यमंत्री झाले आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिफ्ट झाले होते. शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांच्या लहानपाणातील 12 वर्षे याच बंगल्यात गेली आहेत. हेच अशोक चव्हाण पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. हे सगळं सांगताना केसरकर यांनी सांगितले की, शुभ-अशुभ मानणारे असू शकतात. पण आपला या अधंश्रद्धेवर विश्वास नाही. आज या बंगल्यात गणएश लपूजन केले असून २८ तारखेपासून या बंगल्यात राहायला येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या सरकारप्रमाणेच या सरकारमध्येही रामटेक बंगला घेण्यासाठी कोणत्याही मंत्र्याने इच्छा दर्शवली नव्हती. राज्य सरकारच्या वतीने सगळ्या मंत्र्यांकडे त्यांच्या पसंतीच्या तीन बंगल्यांची नावे मागवली होती. त्यात केसरक यांच्या व्यतिरिक्त एकाही मंत्र्याने रामटेक बंगल्याचा समावेश त्या तीन नावांमध्ये केला नव्हता. अंधश्रध्दा मानत नाही सांगणाऱ्या केसरकरांना त्याचमुळे हा बंगला आता देण्यात आला आहे.
1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना हा बंगला देण्यात आला होता. त्यानंतर तेलगी घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. त्यानंतर 2014 साली एकनाथ खडसे यांना हा बंगला देण्यात आला होता. काही दिवसांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळांना पुन्हा मंत्रीपद मिळाले आणि पुन्हा त्यांना रामटेक बंगला देण्यात आला. त्यानंतर अडीच वर्षांतच हे सरकार कोसळले आणि त्यांना पद आणि बंगला दोन्ही सोडावे लागले.