प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, लिपस्टीकमुळे गुन्हा उघड
पत्नीने प्रियकराबरोबर मिळून पतीची हत्या करून त्याला लपवण्याचा कट रचला होता. पण घटनास्थळी कप सापडला, ज्यावर आरोपीच्या ओठांची लिपस्टीक लागलेली होती. याच आधारावर पोलिसांनी शोध घेतला आणि हत्येचा गुन्हा उघड झाला.
मुंबई : आरोपी कितीही चतूर असला तरी घटनास्थळी काही ना काही पुरावा सोडतोच. मीरा रोडमध्येही (mira bhayander murder) अशीच एक घटना घडली आहे. कपावर लागलेल्या लिपस्टीकमुळे हत्येचं गूढ (mira bhayander murder) समोर आलंय. पत्नीने प्रियकराबरोबर मिळून पतीची हत्या करून त्याला लपवण्याचा कट रचला होता. पण घटनास्थळी कप सापडला, ज्यावर आरोपीच्या ओठांची लिपस्टीक लागलेली होती. याच आधारावर पोलिसांनी शोध घेतला आणि हत्येचा गुन्हा उघड झाला.
भाईंदरमधील नवघर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी प्रेमी आणि प्रेमिका आहेत. त्यांचं नाव दिप्ती पाटणकर आणि समाधान पाषाणकर आहे. दीप्ती पाटणकर आणि प्रियकर समाधान पाषाणकरला नवघर पोलिसांनी दिप्तीचे पती प्रमोद पाटणकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली.
आरोपी समाधान पाषाणकर दिप्तीच्या आत्याचा मुलगा आहे. दोघांमध्ये 2015 पासून प्रेमसंबध होते. हे पती प्रमोद यांना माहित झालं. प्रेमसंबंध पतीला माहिती झाल्याने आणि पती आपणास त्रास देतो म्हणून त्याचा पत्ता कट करण्याचा निर्णय पत्नीने घेतला. त्यानुसार तिने प्रियकर समाधान पाषाणकर याला सांगून दोघांनी प्रमोद यांना जीवे मारण्याचं नियोजन केलं.
प्रमोद यांना अगोदर झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि पती झोपल्यानंतर त्याला मारायचं असं ठरवण्यात आलं. त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या आरोपी समाधानने मेडिकलमधून आणून दिल्या. या गोळ्यांपैकी प्रथम दोन वेळा 10-10 गोळ्या देऊन गुंगी आणण्याचा प्रयत्न झाला. पण प्रमोद यांना गुंगी आलीच नाही. यामुळे बेशुद्ध करण्याचा कट यशस्वी झाला नाही.
त्यानंतर 15 जुलै 2019 रोजी पुन्हा प्रमोद यांना मारण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे दिप्तीने आपल्या लहान मुलीला माहेरी नेऊन सोडलं. 15 जुलै सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास प्रमोद यांना चहा बनवून त्यात 20 झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तो चहा दिला. चहा प्यायल्यानंतर काही वेळाने प्रमोद झोपण्यासाठी गेले. या वेळेतच दिप्तीने समाधानला बोलवून घेतलं. समाधानने सोबत कापडी दोरी आणली होती. गळ्यावर उशी टाकून ती दोरीने बांधली. यानंतर समाधान प्रमोद यांच्या पाठीवर बसला आणि दोरी जोरात आवळली. दिप्तीने आपल्या पतीचे पाय दाबून धरले होते. या पद्धतीने दोघांनी मिळून पती प्रमोदचा जीव घेतला.
यानंतरही दिप्ती आणि समाधानने नवा कट आखला. प्रमोद यांनी दुसऱ्या स्त्रीला बोलावलं आणि तिच्यासोबत चहा प्यायला असं दाखवण्याचा प्रयत्न केला. हे दाखवण्यासाठी दिप्तीने चहा बनवला आणि ती निघून गेली. त्यानंतर समाधानने त्याच्या ओठाला लिपस्टीक लावून ते ओठ चहाच्या कपाला लावले आणि बेडरुममध्ये असलेल्या उशीखाली दोन कंडोम ठेवले. बेडरूममध्ये जाऊन कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलं, जेणेकरुन अनोळखी महिलेने चोरी करुन हत्या केली असं दाखवता येईल. पण कपावर असलेल्या लिपस्टीकने दिप्ती आणि समाधान यांचं बिंग फोडलं. पोलिसांच्या चौकशीत दोघांनीही गुन्हा कबूल केला.