‘…तर, त्यादिवशी मी अमेरिकेत जावून बसणार’, आमदार बच्चू कडू बघा काय म्हणाले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल फ्रीच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. या मुद्द्याबाबत बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं.
मुंबई | 26 जुलै 2023 : आमदार बच्चू कडू यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलमुक्त महाराष्ट्रच्या मुद्द्यावरुन आज भाजपवर निशाना साधला. याबाबत बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. “राज ठाकरेंनी याच्यात उडी घेतली ते खूप चांगलं झालं. राज ठाकरेंचं स्वागत करतो. त्यांनी ही उडी कायम ठेवावी. या उडीतून चांगलं निष्पन्न झालं पाहिजे. भांडण्यासाठी कोण ना कोण पाहिजे असतं. सर्व बरोबर असतं असंही नाहीय. मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
“भाजपचं सरकार आलं तर आम्ही टोलमुक्त करु, असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. त्या आश्वासनाचं भाजपने काय केलं?”, असा सवाल राज ठाकरे यांनी आज केला. याबाबत बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता “हे भाजपचं सरकार नाही ना, शिंदे सरकार आहे ना, त्यामुळे प्रोब्लेम असू शकतो”, असं मिश्किल उत्तर दिलं.
‘लोक त्यांना दणका देणारच’
“पूर्ण भाजपचं सरकार नाहीय. तुम्हाला माहितीय की कशाप्रकारे सरकार बनलं आहे. त्यामुळे मोठे निर्णय घेताना काही वेळ द्यावा लागेल. मला वाटतं टोल फ्री राज्य अशी त्यांची भूमिका होती. ती केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आहेच. लोक त्यांना दणका देणारच”, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.
“कुठलीही यंत्रणा ही राजकीय हस्तक्षेपाशिवाय असली पाहिजे. त्या व्यतिरिक्त काहीतरी असलं पाहिजे. ईडीने ज्या पद्धतीने काही गोष्टी केल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, या भूमिकेवर मी ठाम आहे”, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मी कडू जरी असलो तरी त्यांना गोड सल्ला देतो. आजच्या दिवशी आपण चांगलं गोड बोलावं. आम्ही सुद्धा तुम्हाला गोड शुभेच्छा देतो. राज्याच्या राजकारणात काय होईल ते काहीच सांगता येत नाही. आपल्याला माहीत आहे कशापद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे इंडियावाले एनडीत येऊ शकतात किंवा एनडीए इंडियात जाऊ शकतं”, असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. डबल इंडिनचं सरकार म्हणत होते. मग तिसरा डाल्डाचा डब्बा आहे का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “डब्बा कशाचाही असूद्या, आहे ना काहीतरी, त्या डाल्ड्यामध्येही आम्ही काही चांगलं करु ना. डब्बा जरी डाल्डाचा असला तरी त्यामध्ये आम्ही खिचडी पकवू ना. तुम्ही त्याची चिंता करु नका”, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं.
‘त्यादिवशी मी अमेरिकेत जावून बसणार’
“माझं काय होईल म्हणून चिंता करु नका. बच्चू कडू हा बच्चू कडू म्हणून काफी आहे. आमदार, मंत्री असो नसो. मला चिंता नाही. मी स्वत: मंत्रीपद नाकारलं. त्यामुळे तो विषय संपला. ज्यादिवशी विस्तार होईल त्यादिवशी मी अमेरिकेत जावून बसणार आहे”, असं मिश्किल उत्तर बच्चू कडू यांनी दिलं.