Tv9 Special Report : असं काय घडलं की शांत, संयमी प्रणिती रोहित पवार यांच्यावर संतापल्या
रोहित पवार पोरकट असल्याचं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलं. एरव्ही शांत, संयमी वाटणाऱ्या प्रणिती शिंदेंना रोहित पवारांचं कुठलं वक्तव्य जिव्हारी लागलं? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे रोहित पवारांवर चांगल्याच संतापल्या. स्प प्रणिती शिंदे- हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा असतोच काहीजणांमध्ये, थोडे दिवस द्या त्यांना, मॅच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या शरद पवारांचे नातू असलेल्या रोहित पवारांवर भडकल्या आणि त्याला कारण ठरलं.
रोहित पवारांनी सोलापूर लोकसभेच्या जागेबाबत केलेलं वक्तव्य… माझा अंदाज आहे की खासदारकी आणि तिथं असणारी सीट कुठल्या पार्टीला कधी द्यावं कसं द्यावं. याबाबतीतली बैठक कदाचित महिना दोन महिन्यात महाविकास आघाडीची होईल आणि त्याबाबतीत सर्वच घटक पक्षांना विश्वासात घेऊन सोलापूरची जी सीट आहे ती काँग्रेसकडे असावी की राष्ट्रवादीकडे असावी याबाबतीत निर्णय होईल.
प्रणिती शिंदेंच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आक्रमक झालाय. सोलापुरात राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसनं रोहित पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत आणि तेही सोलापूर काँग्रेस कमिटीबाहेर.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजीही केलीय. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला गेल्यास त्याबदल्यात काँग्रेसला कुठली जागा मिळणार याची चर्चा सुरु झालीय. लोकसभेला जेमतेम दीड वर्ष बाकी असल्यामुळं निवडणुकीची तयार सुरु झालीय पण त्याआधीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलीय.
सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2019 साली काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे या जागेवरुन लढले. त्यांच्याविरोधात भाजपनं ऐनवेळी जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही या जागेवरुन लढले.
2019 च्या निवडणुकीत भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींना 5 लाख 24 हजार 985 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना 3 लाख 66 हजार 377 मतं मिळाली. प्रकाश आंबेडकर यांनी 1 लाख 70 हजार 7 मतं मिळाली, 2019 च्या निवडणुकीत जेवढी मतं प्रकाश आंबेडकर यांना मिळाली..जवळपास तेवढ्याच मतांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला.
2014 च्या निवडणुकीतही सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे उमेदवार होते. शिंदेंना 3 लाख 68 हजार 205 मतं मिळाली. सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात भाजपनं ऐनवेळी शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली. मोदींच्या लाटेत बनसोडेंनी तब्बल 5 लाख 17 हजार 879 मतं घेतली.
2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. सुशीलकुमार शिंदेंचं वय जवळपास 81 वर्षे आहे. त्यामुळं त्यांनी याआधीच आपण लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलीय.
सोलापूरच्या जागेबाबत स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशीही चर्चा करु असं सूचक विधान केलंय.. सुशीलकुमार शिंदे लढणार नसल्यानं काँग्रेसकडं स्ट्राँग उमेदवार नाही. त्यामुळं ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार का हे पाहावं लागेल. भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी जात प्रमाणपत्रामुळं अडचणीत आले आहेत.
त्यामुळं भाजपचा पुढचा उमेदवार कोण असणार ही उत्सुकता आहे. जर ही जागा राष्ट्रवादीला गेली तर त्या बदल्यात काँग्रेसला कुठला मतदारसंघ मिळणार याचीही चर्चा सुरु आहे. 2019 ची लोकसभा सोलापुरातून लढलेल्या प्रकाश आंबेडकरांनी सध्या ठाकरे गटासोबत युती केलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीही प्रकाश आंबेडकरांनाच पाठिंबा देणार का?
अशा अनेक शक्यताही सध्या वर्तवल्या जात आहेत. या सर्व शक्यता आणि चर्चा सध्या प्राथमिक पातळीवर आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालंय.