‘भाजपाने लक्षात ठेवावं…’; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या मालकीचा संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना, स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावी असं म्हटलं आहे.
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामीत अॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण रोह्चता . झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचं थयथयाट झाल्याशिवाय राहणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले.
ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती.