‘आधी 10 जागा सांगितलेल्या, दोन किंवा तीन तरी घ्या’; रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामीत अॅग्रोच्या मालकीचा असलेल्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. कन्नड साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची माहिती दिली. साताऱ्यामधील कोरेगावमध्ये असणाऱ्या जरांडेश्वर साखर कारखान्यावेळी आलेली नोटीस सेम तशा प्रकारेच कॉपी पेस्ट केल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
जरांडेश्वर साखर कारखान्याची सखोल माहिती घेतली तर तुम्हाला सर्व काही लक्षात येईल. ज्यांच्यावर आरोप केले गेले त्यांनी पक्ष सोडला पण आम्ही लढत राहणार असल्याचं म्हणत रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवारांनी महायुतीमध्ये जागा वाटपावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीवारीवरून निशाणा साधला. शरद पवार प्रमुख होते तेव्हा शरद पवार बोलायचे. आता ते प्रमुख झाले आहे. आता ते वाटाघाटी करायला जातायेत पण काहीच चालत नाही 2 किंवा 3 जागा घ्याव्या लागताय. आधी सांगितलेल्या 10 जागा तरी घ्या, जबाबदारी घेणं हे काय सोप नसतं असं रोहित पवार म्हणाले.
निनानी फाईलबद्दल पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मी सत्ताधाऱ्यांविरोधात लढत असताना माझ्याकडे निनावी फाईल आली आहे. अनेक नेत्यांच्या फाईल माझ्या ऑफिसमध्ये आल्या आहेत. ठाणे-मुंबईतल्या आरक्षित जागा बिल्डरला विकल्याची फाईलही माझ्या ऑफिसला आली आहे. तसेच मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्या ऑफिसला आली आहे. एवढी सगळी माहिती असलेल्या फाईल अचानक माझ्या ऑफिसला आल्या कशा? मी माझ्या काही तज्ज्ञांना त्या फाईली अभ्यास करायला दिल्या आहेत. मी ज्या व्यक्तीने या फायली पाठवल्या आहेत त्यांचे मी आभार. सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने उघड करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, मी निवडणूक काळात शांत बसावं म्हणून ही नोटीस दिली जातेय का? केंद्राला राज्याच्या पोलिसांवर विश्वास नाही असं प्रत्यक्षपणे सांगायचं आहे का? बारामती अॅग्रो कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं रोहित पवार म्हणाले.