“संजय राऊत यांनी शिवसेना बुडवायची सुपारी घेतलेय”; शिंदे गटाच्या नेत्याने राऊतांची मानसिक अवस्था काढली
सुपारी घेऊन संजय राऊत काम करत आहेत. त्यातच त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठीचा वचक राहिला नाही अशी खोचक टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
मुंबईः शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शाब्दिक चकमकींना प्रचंड ऊत आला आहे. त्यातच ठाकरे गटाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला समर्थन दिल्यामुळे हा वाद आणखी शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनाच वेळोवेळी लक्ष्य केले जात आहे. त्यातच संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभाग दर्शवल्यामुळे आता त्यांच्यावरही प्रचंड जोरदार टीका होऊ लागली आहे.
याच कारणामुळे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांनी शिवसेना बुडवायची सुपारी घेतली आहे.
सुपारी घेऊन संजय राऊत काम करत आहेत. त्यातच त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठीचा वचक राहिला नाही अशी खोचक टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणाचा वाद सध्या न्यायालयाता आहे. त्यावरही संजय शिरसाठ यांनी बोलताना हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाचे काय होणार आणि कसे होणार हे ठाकरे गटाला चांगलेच माहिती आहे.
सध्या हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे की त्यांचे येथे काही होणार नाही. कागदोपत्री त्यांच्या असंख्य चुका आहेत. त्यामुळे ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आली आहे असंही त्यांनी विश्वासाने सांगितले आहे.
संजय राऊत पाहिजे तशी वक्तव्य करत असले तरी ऊद्धव ठाकरे यांना काहीच का बोलत नाही, त्यांना आवरत का नाहीत, पक्ष रसातळाला चालला आहे तरी यांचे डोळे उघडत नाहीत, हे फार वाईट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच शिंदे गटाची आमची ताकद वाढतेय आहे पुढेही वाढणार आहे. निवडणूक आयोगात धनुष्यबाण आम्हालाच मिळणार असून आम्हीच गुलाल उधळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय शिरसाठी यांनी संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते जम्मूत जाऊन राहूल गांधींना भेटले आहेत, आता सेना भवनात राहुल गांधींना मिठी मारल्याचा फोटो लावतील असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.