मुंबई- संपूर्ण राज्यात भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? हे आधी त्यांनी सांगावं, असा सवाल शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी विचारला आहे. मुंबईतल्या टोलदरवाढीवरून भाजपने टीका केली होती. त्यांच्या टीकेला सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं आहे. (MLA Sunil Prabhu reply Bjp Over Toll Rate Increases)
ऐन कोरोनाच्या काळात मुंबईतल्या टोल दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आता वाढीव बोजा पडणार आहे. याच मुद्दयावरून भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या काळात नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना सरकारने नागरिकांचा विचार करायला हवा होता, असा सल्ला भाजपने दिला होता.
भाजपच्या टीकेला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले, “2002 मध्ये जे सरकार सत्तेवर होतं त्यांच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरवाढ होत असते. आरोप करण्या आधी भाजपने कारण तपासायला हवं होतं”
“2002 साली जे सरकार होतं त्यांनी करार केला होता. त्यानुसार दर तीन वर्षांनी टोल दरवाढ होईल. त्यामुळे करारानुसार टोलवाढ झाली आहे, असं सुनील प्रभू म्हणाले. सध्या दरवाढ झाल्यानंतर त्यानंतर 2023 आणि त्यानंतर 2026 ला टोलदर होईल. त्यामुळे करारनुसार पैसे वाढले आहेत. त्यामुळे कुणीही राजकारण करू नये”, असं प्रभू म्हणाले.
पुढे बोलताना सुनील प्रभू म्हणाले, “संपूर्ण राज्यात टोल मुक्तीचं आश्वासन भाजपने दिलं होतं त्याचं काय झालं हे त्यांनी आधी जाहीर करावं. तर मुंबई आणि पुणे टोलनाके का बंद केले नाहीत याचंही उत्तर त्यांनी द्यावं”
मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात वाढ-
येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच आर्थिक परिस्थितीला तोंड देणाऱ्या मुंबईकरांवर आता वाढीव टोलचाही बोजा येणार आहे.
मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत. 2002 ते 2027 या 25 वर्षांत शहरातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले आहेत. एमईपी कंपनी आणि राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, आता 1 ऑक्टोबरपासून टोल दरात वाढ होणार आहे.
नवीन दरांनुसार हलक्या वाहनांच्या टोल दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता टोलचा 35 रुपयांवरुन 40 रुपये होईल. तर, प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन त्यासाठी आता 65 रुपये मोजावे लागणार आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यासाठी आता 105 नाही तर 130 रुपये द्यावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या-
Toll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5 ते 25 रुपयांची वाढ
एकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन
(MLA Sunil Prabhu reply Bjp Over Toll Rate Increases)