कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा युटर्न का?; वाचा सविस्तर
2018 मध्ये राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, असा इशारा दिला होता. | Raj Thackeray Nanar
मुंबई: कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला (Nanar refinery project) कडाडून विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेत आता बदल झाला आहे. कोरोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या अर्थचक्राची गती वाढवण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. (raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)
2018 मध्ये राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, असा इशारा दिला होता. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणाले?
या प्रकल्पाच्या विरोधात त्यावेळी असलेली स्थानिक मच्छिमारांची भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा औद्योगिकीकरणात अग्रेसर महाराष्ट्र ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही.
आज कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशाप्रसंगी राज्य ठामपणे उभे राहण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टीकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवं. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होतील त्यात कोकणी आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांना प्राधान्य असायला हवे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
नाणार प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती
आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. कोरोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरू शकते.
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?
नाणार प्रकल्प हा जगातील मोठया तेलुशद्धीकरण प्रकल्पांपैकी एक असेल. त्यासाठी तब्बल 15 हजार एकर जमीन अधिग्रहीत करावी लागेल. त्यामुळे नाणारमधील 8 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागतील. तसेच अनेक कुटुंबे विस्थापित होतील. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा आहेत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार नष्ट होईल. तसेच या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे समुद्राचे प्रूदषण होण्याचाही धोका आहे. परिणामी हजारो मच्छिमाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. मात्र, आता कोरोना संकटानंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांच्या भूमिकेत बदल झाल्याचा दावा काहीजण बोलून दाखवत आहेत.
संबंधित बातम्या:
नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत
(raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)