मुंबई मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी नाही, मनसेकडून राज्य सरकारचा निषेध
आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे
मुंबई : मुंबई मेट्रोचा (Mumbai Metro Stone Foundation) भारतीय बनावटीचा कोच, मेट्रो भवन आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्धाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल होत असल्याचं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
‘आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे! महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल. राज्य शासनाचा निषेध’ असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे! महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल. राज्य शासनाचा निषेध pic.twitter.com/dfBrVIqoJm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 8, 2019
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रथम मेट्रो कोच का उद्घाटन समारोह श्री नरेन्द्र मोदी प्रधानमंत्री, भारत सरकार के कर कमलों द्वारा संपन्न हुआ’ असं उद्घाटन शिळेवर लिहिलेलं दिसत आहे. त्याखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांची नावं आहेत.
राज्य सरकारच्या मराठीद्वेष्टेपणाचा मनसेने समाचार घेतला आहे. यापूर्वी मनसेने दुकानांवरील पाट्यांसाठी आंदोलन केलं होतं. ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसेनेही ईडीला नोटीस पाठवल्याचाही दावा केला जात होता.
भूमिपूजन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली होती. माझा लहान भाऊ उद्धव ठाकरे असा उल्लेख मोदींनी केला. नमस्कर मुंबईकर…गणपती बाप्पा मोरया. गणेश उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, अशा मराठीत शुभेच्छा मोदींनी दिल्या. मोदींनी मुंबईकरांना गणेशोत्सवानिमित्त प्लास्टिकमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन केलं होतं.