संजय राऊत वाघ्या आणि सुषमा अंधारे मुरळी तर उद्धव ठाकरे…; मनसे नेत्याचं विधान चर्चेत
Prakash Mahajan on Sanjay Raut and Sushma Andhare : मनसे नेत्याच्या नेत्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. वाघ्या आणि मुरळी असं म्हणत मनसे नेत्याने निशाणा साधला आहे. कुणी केली ठाकरे गटावर टीका? वाचा सविस्तर बातमी...
मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा होत आहे. या मेळाव्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाषण केलं. तेव्हा संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटामध्ये दोन मोठे नेते आहेत. एक सुषमा अंधारे आणि संजय राऊत. एक वाघ्या आणि दुसरी मुरळी. हे उद्धव ठाकरेंना बुक्का लावतील आणि घरी बसवतील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे किरकोळ नेते आहेत. उद्याचा नटसम्राट सिनेमा करायचा ठरवलं तर उद्धव ठाकरेंना करा. ते उद्या घर देता का घर हा संवाद म्हणतील, कुणी मुख्यमंत्रीपद देतं का मुख्यमंत्रीपद.. हा कोमट पाणी प्यायलेला, थकलेला कुणी घर देता का घर, असं मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
भाजपवर निशाणा
अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपतोबत जाणं पसंत केलं. यावरही प्रकाश महाजनांनी भाष्य केलं. महायुतीतील पहिला पक्ष भाजप. मला भाजप सोडून २५ वर्ष झाली. भाजप आता पूर्वीसारखा नाही. कधी कधी वाटतं बरं वाटतं बरं आहे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन नाही. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीविरोधात पूर्ण हयात घालवली. यांनी त्या अजितदादालाच घरात घेतलं, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मनसे जातपात मानत नाही- महाजन
राज ठाकरे अंतरवली सराटीत आले. हे होणार नाही. हे सर्व लोक तुम्हाला आशेला लावतात. हे सांगण्याची हिंमत फक्त राज ठाकरेंमध्ये होती. कारण आमचा पक्ष जातपात मानत नाही. आर्थिक निकषावर आरक्षण असावं, ही मागणी राज ठाकरेंनी केली होती. हीच मागणी कित्येक वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी केली होती. आज आरक्षणामुळे लोक एकमेकांकडे पाहत नाही. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे, असंही महाजन म्हणालेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यावर आजच्या मेळाव्यात प्रकाश महाजन यांनी भाष्य केलं आहे. आमचा नेता सांगतो मुंबई ते गोवा महामार्ग तयार करा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या. हे सांगणारा आमचा नेता आहे. आणि त्यांचा नेता तिकडे राहुलची माय आणि मुख्यमंत्रीपद वाढ गं माय म्हणतो, असं त्यांनी म्हटलं आहे.