‘कितीही करा फणा काढतातच, मी बी पट्टीचा गारुडी, वेळ आली की…’; वसंत मोरेंचा कोणाला इशारा?
लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी पुण्यात मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशातच वसंत मोरे यांचं व्हाट्सअॅप स्टेटस जोरदार व्हायरल झालेलं पाहायला मिळत आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपावरून हेवे दावे होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपसह अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आता सत्तेत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणूकांवेळी जागावाटप कसे करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही जागांवर आतापासूनच धुसफूस असलेली पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये एका जागेवर लढण्यासाठी मनसेच्या दोन नेत्यांनी दावा केला आहे. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी आपण निवडणुक लढवण्यासाछी तयार असल्याचं सांगितलं आहे. मात्र पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर इतर राजकीय गणितांची बांधणी होणार आहे.
मागे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना दिल्लीत पाहायचं असल्याचं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र आता शर्मिला ठाकरे यांनीच साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमामध्ये साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असं म्हटलं होतं. आधीच मोठा पेच असताना शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने तिकिटासाठी त्यांचाच विचार केला जात असल्याची चर्चा होऊ लागली. या चर्चेदरम्यान वसंत मोरेंच्या व्हाट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा होत आहे.
कुणासाठी कितीबी करा राव पण वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार, असं वसंत मोरे यांनी आपल्या व्हाट्सअॅप स्टेटमध्ये लिहिलं. त्यामुळे वसंत मोरे यांचा रोख नेमका कोणावर आहे? याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेचं तिकिट मनसेकडून कोणाला मिळतं हे याची पुणेकरही आतुरतेने वाट पाहत आहेत.