मुंबई: येत्या 3 मे रोजी मनसेकडून (mns) राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा करण्यात येणार आहे. 3 मे रोजी ईद असली तरी त्याच दिवशी अक्षय तृत्तीयाही आहे. त्यामुळे त्या दिवशी राज्यात महाआरती आणि हनुमान चालिसाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी दिली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या बैठकीत औरंगाबादच्या सभेची तयारी आणि अयोध्येतील दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यकर्ते आता कामाला लागतील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेवर उत्तर देण्यास नकार दिला. संजय राऊत हे फार मोठे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबाबत काही बोलणार नाही, असं नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतिर्थावर बैठक पार पडली. मुंबईसह नाशिक, ठाणे, पुण्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या 1 मे रोजी औरंगाबादेत सभा होत आहे. या सभेच्या तयारीची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ही सभा कशी मोठी होईल त्याच्या सूचना दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
3 तारखेला अक्षय तृत्तीया आहे. त्या दिवशी परवानगी घेऊन हनुमान चालिसा आणि आरती घेणार आहोत. या संदर्भात सरकारची बैठक सुरू आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काही निर्णय घेतील. त्यामुळे सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करता येणार नाही. गाईडलाईन आल्यावरच विचार विनियम करू, असं त्यांनी सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाने कायद्याच्या कक्षेत राहून काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
MNS Raj Thackeray: भोंग्यांच्या डेडलाईन आधीच शिवतीर्थावर मनसेची खलबतं; राज ठाकरे काय आदेश देणार?
रजनी कुडाळकर आत्महत्येप्रकरणी नवा ट्विस्ट! रजनी कुडाळकरांच्या आत्महत्येला जबाबदार असणारी महिला कोण?