“अमितला निवडून आणणारच”, राज ठाकरेंचा निर्धार, सदा सरवणकरांना दिला इशारा
आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर त्यांच्यासाठी उमेदवार दिला नाही, याबद्दलही त्यांनी पुर्नच्चार केला. तसेच अमित ठाकरेंसाठी कोणाकडेही भीक मागणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभेसाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. सध्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची सातत्याने चर्चा सुरु आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरेंना उमेदवारी दिली जाते. नुकतीच अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची पहिली सभा पार पडली. प्रभादेवीच्या सामना प्रेसजवळ ही सभा घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी दादर-माहीम मतदारसंघात आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. त्यामुळे अमितला नक्की निवडून आणणार, असा निर्धार व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी या सभेवेळी अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यावरही टीका केली. तसेच आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर त्यांच्यासाठी उमेदवार दिला नाही, याबद्दलही त्यांनी पुर्नच्चार केला. तसेच “अमित ठाकरेंसाठी कोणाकडेही भीक मागणार नाही”, असेही ते म्हणाले.
“अमितसाठी माझी एकच सभा”
“१९९५ मध्ये शिवसेनेसाठी माझ्या १७५ सभा झाल्या. अनेकांसाठी सभा झाल्या. त्यातल्या एकासाठी इथे देखील सभा झाली होती. आमच्या ठाकरेंचा संपूर्ण प्रवासाची मूळ भूमी ही दादर-प्रभादेवी-माहीम ही सर्व आहे. जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या तीन पिढ्या या महाराष्ट्रासाठी काम करण्यात गेल्या. याच दादर-माहीम मतदारसंघात आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. अमितसाठी माझी एकच सभा आहे. मी प्रत्येकासाठी सभा देतोय”, असे राज ठाकरे म्हणाले.
“अमित उभा असतानाही मी भीका मागणार नाही”
“जेव्हा उद्धव आजारी होता, त्यावेळी सर्वात आधी मी रुग्णालयात भेटायला गेलो. मी परिवाराच्या आड कधीही राजकारण येऊ दिलं नाही. वरळीतून पहिल्यांदा आदित्य उभा राहिला. तिथे मनसेची ३७ ते ३८ हजार मतं आहेत. पण मी म्हटलं आमच्या कुटुंबातील पहिला माणूस उभा राहतो, मी उमेदवार देणार नाही. ही माझ्या मनातून आलेली गोष्ट होती. मी कोणाला फोन केला नाही. मी असल्या फालतू भीका मागत नाही. माझ्याकडून चांगुलपणातून जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा असतानाही मी भीका मागणार नाही”, असेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
“मला त्या घाणीत हात घालायचा नाही”
“मी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा अमित निवडणुकीला उभा राहिल हे मनातही नव्हतं. माझ्या सोडा त्याच्याही मनात नव्हतं. त्यामुळे तो विषयच नव्हता. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की चांगुलपणातून होणार असेल तर करा, नाहीतर नका करु. पण अमित उभा आहे म्हणून उमेदवार मागे घ्या, तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर नका करु. जे समोर येतील त्यांच्याशी लढू. पण अमितला निवडून नक्की आणणार. जे विरोधात उमेदवार उभे आहेत, त्यांची अंडीपिल्ली मी बाहेर काढू शकतो. पण मला त्या घाणीत हात घालायचा नाही. मला महाराष्ट्र घडवायचाय”, असेही राज ठाकरे म्हणाले.
“जो कोणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल काही बोलायचं?”
“त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. पण जो कोणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं? बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली. काँग्रेसमधून आमदारकीला पडली आणि मग पुन्हा शिवसेनेत आली. त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवली. एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यानंतर त्यांना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत जाऊन बसले. कोण ही माणसं? व्यक्ती म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल, हे आपले आहेत की नाही, त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार?” असा टोलाही राज ठाकरेंनी सदा सरवणकरांना लगावला.
याच मतदारसंघातून जे दुसरे उमेदवार उभे आहेत, ते बाळासाहेब हयात असताना शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढवत होते, असेही राज ठाकरे म्हणाले.