मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील सभेमध्ये सर्वच पक्षांवर आसुड ओढलेलं पाहायला मिळालं. भोंग्याच्या मुद्दा, शिंदेंचं बंड ते मविआच्या सत्ता स्थापनेवरूनही त्यांनी भाष्य केलं. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये शिंदे-भाजपवरही निशाणा साधला. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सभा घेण्यावरून सुनावलं.
एकनाथ शिंदे मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसले आहात, महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे सभा घेऊ नका. महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्राचे किती प्रश्न आहे. पेन्शनचा विषय मिटवा. शेतकऱ्याचे विषय आहे. अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यांना भेटा, सभा कसल्या घेताय, असा सवाल करत राज ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला.
सध्या सुशोभिकरण सुरु आहे. जेवढे दिव्याचे पोल आहेत त्याला लाईट लावले आहेत. रात्री डान्सबार आहे की रस्ते कळत नाही. असं सुशोभीकरण आहे काय? ही लायटींग लावायची पद्धत आहे का? जगामध्ये तुम्ही जाता तेव्हा बघा किती स्वच्छ शहरे असतात. सशोभीकरणाच्या नावाखाली 1700 कोटींचे खर्चे केले. ते काही कायमचे आहेत का? असंही राज ठाकरे म्हणाले.
कोरोना काळात मुख्यमंत्री भेटायला तयार नाही. कुणालाही भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडले. 21 जूनला समजलं की, एकनाथ शिदे आमदार घेऊन सूरतला गेले आणि पुढे गुवाहाटीला. महाराज सूरतहून लूट करुन महाराष्ट्रात आलेले. महाराष्ट्रातून लूट करुन सूरतला गेलेले हे पहिलेच, असंही राज ठाकरे म्हणाले.
मला दाबण्याचा प्रयत्न केला गेला- राज ठाकरे
“मला घरातल्या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. त्यांच्या बाजूच्या लोकांना आधीच सांगून ठेवतो की, मी बोलल्यानंतर उद्या तोंड उचकटू नका. कारण त्यानंतर मी जे बोलेल ते तुम्हाला झेपणार नाही. मला फक्त दोन घटना सांगायच्या आहेत. तुम्हाला फक्त महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याअगोदर काय गोष्टी घडल्या सांगतो. आताची परिस्थिती का ओढवली त्यासाठी सांगतोय. मला भींतीकडे दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. पण मला काही फरक पडत नव्हता.”