“मोदी सरकारच्या परवानगीनं इस्राईलमधून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी”
मोदी सरकारच्या परवानगीनं इस्राईलमधून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी (Spying on journalist and activists) सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मुंबई : मोदी सरकारच्या परवानगीनं इस्राईलमधून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी (Spying on journalist and activists) सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकुमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी (Spying on journalist and activists) आम्ही खपवून घेणार नाही. त्याविरोधात लढा उभारु, असंही आव्हाड यांनी नमूद केलं. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, मोदी सरकारने या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारतातील अनेक विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवहक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्राईलच्या एन. एस. ओ. समूहाने मोदी सरकारच्या परवानगीनेच सुरु केले. सरकारनेच भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली आहे.”
ह्या सरकारचे काय चालू आहे … सगळ्यांच्या खासगी आयुश्यावर नजर #धिक्कार pic.twitter.com/jf64Q0Oogk
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 31, 2019
संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकुमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारु, असा इशाराही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला. आव्हाड म्हणाले, “इस्राईलच्या एन. एस. ओ. समूहावर कॅलिफोर्नियात एक खटला दाखल झाला आहे. याच्या सुनावणीत भारतातील अनेक विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांचे व्हॉट्सअप मेसेज आणि कॉलवर मे 2019 पर्यंत पाळत ठेवण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा व्हॉट्सअपने केला आहे.”
एन. एस. ओ. ही कंपनी पीगेसस नावाचं एक सॉफ्टवेअर बनवते आणि मोबाईल धारकाच्या स्मार्टफोनमध्ये चलाखीने पेरते. ’एक्सप्लॉईट लिंक’ या नावाचा पर्याय जर तुम्ही कळत नकळत क्लिक केला, तर पीगेसस तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हॉट्सअपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पीगेसस वाचू शकतो. हे या खटल्यामुळे उघडकीस आले आहे, असंही आव्हाड यांनी नमूद केलं.